काले आरोग्य केंद्रात लसीकरण पंधराशेपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:35 IST2021-04-05T04:35:03+5:302021-04-05T04:35:03+5:30
मलकापूर : काले (ता. कऱ्हाड) प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना लसीकरण केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे अचूक नियोजन केले ...

काले आरोग्य केंद्रात लसीकरण पंधराशेपार
मलकापूर : काले (ता. कऱ्हाड) प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना लसीकरण केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे अचूक नियोजन केले आहे. केंद्राने लसीकरणात पंधराशेचा टप्पा पार केला आहे. लसीकरण प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने होत असल्याच्या प्रतिक्रिया लस घेतलेल्या नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाच उपकेंद्र व मलकापूर शहरासह १४ गावे येतात. या गावांमध्ये ७८ हजार एवढी लोकसंख्या आहे. आरोग्य मंत्रालयाने लागू केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र यादव व डॉ. तबस्सुम कागदी यांच्या अचूक नियोजनानुसार व सर्व प्रशिक्षित स्टाफच्या सहकार्याने कोरोना लस नागरिकांना दिली जात आहे.
एवढ्या लोकसंख्येच्या परिसरात काले प्राथमिक आरोग्य केंद्राने कोरोना लसीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली. आत्तापर्यंत काले पंचक्रोशीतील विविध मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, विविध शिक्षण संस्थात अध्यापनाचे कार्य करणारे शिक्षक, शिक्षिका यांनी कोरोना लस घेऊन आरोग्य प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले. १३ फेब्रुवारीला याठिकाणी लसीकरणाला सुरूवात झाली. आजअखेर ४८ दिवसात ८९० जणांना कोव्हीशिल्ड लस व ६२० जणांना को-व्हॅक्सिन लस देण्यात आली आहे. त्यामुळे काले प्राथमिक आरोग्य केंद्राने आजअखेर कोरोना लसींचा पंधराशेचा टप्पा पूर्ण केला.
- चौकट
अफवांवर विश्वास ठेवू नका... लस घ्या
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, शासन वितरीत करत असलेल्या या लसीवर विश्वास ठेवत अधिकाधिक लोकांनी लस घेऊन कोरोनावर मात करावी. आपण व आपले कुटुंब सुरक्षित ठेवावे. केंद्रात पुरेशी लस उपलब्ध असून, नागरिकांनी लस टोचून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र यादव व डॉ. तबस्सुम कागदी यांनी केले.
फोटो : ०४केआरडी०१
कॅप्शन : काले (ता. कऱ्हाड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी स्वतंत्र कक्ष असून, तज्ज्ञ कर्मचाऱ्यांमार्फत लसीकरण केले जात आहे. (छाया : माणिक डोंगरे)