हातोहात खपल्या काश्मिरी सफरचंदच्या पंधरा हजार पेट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:36 IST2018-10-21T23:36:14+5:302018-10-21T23:36:18+5:30
प्रशांत कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : खवय्येगीर सातारकर जिभेचे चोचले भागविण्यासाठी कधीच मागे नसतात. साताऱ्यातील बाजारपेठेत काही ...

हातोहात खपल्या काश्मिरी सफरचंदच्या पंधरा हजार पेट्या
प्रशांत कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : खवय्येगीर सातारकर जिभेचे चोचले भागविण्यासाठी कधीच मागे नसतात. साताऱ्यातील बाजारपेठेत काही दिवसांपूर्वी काश्मिरी सफरचंदांची आवक वाढली होती. हे सफरचंद खरेदी करण्यासाठी सातारकरांनी गर्दी केली होती. तब्बल पंधरा हजार पेट्या कधी संपल्या हे फळविक्रेत्यांनाही समजले नाही. यातून लाखो रुपयांची उलाढाल झाली.
देशात काश्मीरमधील सफरचंदला मोठी मागणी असून, त्यातील ‘डेलिसन’ या जातीला ग्राहकांमधून अधिक पसंती आहे. सध्या डेलिसन या सफरचंदला बाजारात एका पेटीला सुमारे ५०० ते १२०० पर्यंत दर मिळतो. या सफरचंदचा वर्गवारीनुसार दर ठरविला जातो. डिझेल दरवाढीमुळे यंदा सफरचंदच्या वाहतूक खर्चात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एका ट्रकमध्ये एक हजार पेट्या येत असून, जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये १५ ट्रकमधून १५ हजार सफरचंदच्या पेट्या दाखल झाल्या होत्या. एका पेटीत सुमारे १५ किलो सफरचंद भरतात. काश्मीरच्या सफरचंदाचा १५ आॅगस्ट ते फेब्रुवारी, मार्चपर्यंत हंगाम सुरू असतो. त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात सफरचंदला स्टोअरमध्ये दाखल केले जाते. त्यानंतर दरात वाढ झाली की पुन्हा बाजारपेठेत आणले जाते. नवरात्रीत केला जाणाºया उपवासाच्या काळात ते बाजारात आणले होते.
‘जिल्ह्यात काश्मीर डेलिसन अन् हिमाचलचा सिमला दोन प्रकारच्या सफरचंद येत असतात. यातील काश्मिरी डेलिसन या सफरचंदला सातारकरांची अधिक पसंती मिळाली,’ अशी माहितीही किरकोळ विक्रेत्यांनी दिली.
नवरात्रोत्सवात घरोघरी नऊ दिवस उपवास केला जातो. या काळातच हे फळ बाजारात आल्याने त्यांना चांगली मागणी व दर मिळाला, अशी माहिती फळे विक्रेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.