काले प्राथमिक आरोग्य केंद्र कोविड लसीकरणात पंधराशे पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:39 IST2021-04-04T04:39:52+5:302021-04-04T04:39:52+5:30
मलकापूर : काले प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड लसीकरण केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे अचूक नियोजन केले आहे. यामुळे ...

काले प्राथमिक आरोग्य केंद्र कोविड लसीकरणात पंधराशे पार
मलकापूर : काले प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड लसीकरण केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे अचूक नियोजन केले आहे. यामुळे काले प्राथमिक आरोग्य केंद्राने कोविड लसीकरणात पंधराशेचा टप्पा पार केला आहे. लसीकरण प्रक्रिया नियोजनबद्द होत असल्याच्या प्रतिक्रिया लस घेतलेल्या नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
काले प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ५ उपकेंद्रे व मलकापूर शहरासह १४ गावे येतात. त्या गावामधील ७८ हजार एवढी लोकसंख्या आहे. आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन यांनी लागू केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काले प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र यादव व डॉ. तबस्सुम कागदी यांच्या अचूक नियोजनानुसार व सर्व प्रशिक्षित स्टाफच्या सहकार्याने कोविड लस नागरिकांना दिली जात आहे. एवढ्या लोकसंख्येच्या परिसरात काले प्राथमिक आरोग्य केंद्राने कोरोना लसीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली. आत्तापर्यंत काले पंचक्रोशीतील विविध मान्यवर, जेष्ठ नागरिक, विविध शिक्षणसंस्थांत अध्यापनाचे कार्य करणारे शिक्षक, शिक्षिका यांनी कोविड लस घेऊन आरोग्य प्रशासनास मोलाचे सहकार्य केले. काले प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेल्या नियोजनाबद्दल कौतुक केले. १३ फेब्रुवारीला या आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणास सुरुवात झाली. आजअखेर ४८ दिवसांत ८९० जणांना कोव्हिशिल्ड लस व ६२० जणांना को-व्हॅक्सिन लस देण्यात आली आहे. त्यामुळे काले प्राथमिक आरोग्य केंद्राने आजअखेर कोविड लसींचा पंधराशेचा टप्पा पूर्ण केला.
चौकट
आफवांवर विश्वास ठेवू नका, लस घ्या
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासन वितरित करत असलेल्या या लसीवर विश्वास ठेवत अधिकाधिक लोकांनी कोविड लस घेऊन कोरोनावर मात करावी. आपण व आपले कुटुंब सुरक्षित ठेवावे. केंद्रात पुरेशी लस उपलब्ध असून, नागरिकांनी लस टोचून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र यादव व डॉ. तबस्सुम कागदी यांनी केले.
चौकट
लसीकरणासह अंतर्गत निरीक्षणासाठी स्वतंत्र कक्ष
लसीकरणासाठी स्वतंत्र कक्ष व स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रथम नोंदणी व नंतर सॅनिटायझर देऊनच सामाजिक अंतराने लसीकरण कक्षात प्रवेश दिला जातो. लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास निरीक्षणात ठेवण्याचा नियम आहे. त्यासाठी सर्व सोयींनीयुक्त स्वतंत्र कक्ष बनवण्यात आला आहे.
फोटो ओळ -
काले (ता. कऱ्हाड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी स्वतंत्र कक्ष व तज्ज्ञ कर्मचाऱ्यांमार्फत लसीकरण केले जात आहे. (छाया - माणिक डोंगरे)