विजेअभावी पन्नास एकरातील पिके होरपळली

By Admin | Updated: July 18, 2015 00:18 IST2015-07-17T21:55:16+5:302015-07-18T00:18:18+5:30

बागलवाडीतील स्थिती : अधिकारी दाखवा, बक्षीस मिळवा; शेतकऱ्यांची योजना

Fifteen hundred acres of crops fell due to power failure | विजेअभावी पन्नास एकरातील पिके होरपळली

विजेअभावी पन्नास एकरातील पिके होरपळली

ढेबेवाडी : वीजवितरण कंपनीच्या तळमावले येथील उपभियंत्याने शेतकऱ्यांनाच वेठीस धरल्याने सुमारे पन्नास एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दीड महिन्यापूर्वी जळालेला ट्रान्सफॉर्मर बदलण्याची मागणी करूनही दुर्लक्ष करणारा हा अधिकारीच नुकसानीस जबाबदार असल्याचा आरोप करीत ‘अधिकारी दाखवा, बक्षीस मिळावा,’ अशी योजनाच शेतकऱ्यांनी जाहीर करून आपला संताप व्यक्त केला.
काढणे- बागलवाडी, ता. पाटण येथील शेतकऱ्यांनी निवदेनाद्वारे ही माहिती दिली. यामध्ये शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, दीड महिन्यापूर्वी पेरण्या केल्या आहेत. पेरणीनंतर पावसाने दडी मारली; मात्र नदीला पाणी आहे. शेतीपंपांची योजनाही आहे. पण, वीज नसल्याने पिके अडचणीत आली आहेत.
दीड महिन्यापूर्वी बागलवाडीनजीकचा ‘यदवडी’ नावाच्या शिवारात असलेला ट्रान्सफॉर्मर जळाला. याबाबतची तक्रारही आम्ही तळमावले येथील विद्युत कार्यालयात केली. दररोज हेलपाटेही मारतो; पण येथील अधिकारी नेहमीच गैरहजर असतात.
याबद्दल वारंवार कार्यालयात जाऊनसुध्दा संबंधित अधिकारी भेटत नसल्याने ‘अधिकारी दाखवा आणि बक्षीस मिळवा,’ अशी योजनाच आम्ही जाहीर केली आहे.
संबंधित ट्रान्सफॉर्मरवर काढणे-बागलवाडी येथील नऊ शेतकऱ्यांची शेतीपंपांची कनेक्शन आहेत. या योजनांद्वारे सुमारे ५० एकर क्षेत्रातील पिकांना पाणी दिले जाते. सध्या पाऊसही नाही आणि विजेअभावी योजनाही बंद असल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. ट्रान्सफॉर्मर बदलून मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी आरोप केले आहेत.
रणजित गायकवाड, मनोहर मदने, वसंत पाटील, सिदू तुपे, सतीश मदने आदी शेतकऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत. (वार्ताहर)

बिल भरले; पण वीज नाही!
ट्रान्सफॉर्मरबाबत तक्रार करण्यासाठी गेलो असता, संबंधित अधिकाऱ्यांनी ‘पहिले बिले भरा; मगच ट्रान्सफॉर्मरचे बघू,’ अशी तंबी दिल्याने शेतकऱ्यांनी बिले भरली. तरीसुध्दा ट्रान्सफॉर्मर बदलून मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
वाहतुकीचे पैसेही दिले
यापूर्वीही ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला होता. त्यावेळीही आम्ही तक्रार केली; मात्र तीच परिस्थिती. कोणी लक्षच देईना. अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी ट्रान्सफॉर्मर वाहतुकीचे तीन हजार रुपये आम्हालाच द्यायला लावले. पैसे देऊन आम्ही ट्रान्सफॉर्मर बदलून घेतला होता. आता अधिकारीच भेटेनासे झालेत, असेही शेतकरी म्हणाले.

Web Title: Fifteen hundred acres of crops fell due to power failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.