मतांच्या बेरजेसाठी आमदारांची फिल्डिंग

By Admin | Updated: September 20, 2014 00:34 IST2014-09-19T22:40:41+5:302014-09-20T00:34:04+5:30

जिल्हा परिषद : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत रस्सीखेच

Fielding of MLAs to vote for votes | मतांच्या बेरजेसाठी आमदारांची फिल्डिंग

मतांच्या बेरजेसाठी आमदारांची फिल्डिंग

मोहन मस्कर-पाटील - सातारा -जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर आपलाच सदस्य बसवून विधानसभा निवडणुकीत मतांची बेरीज आणि जातीय समीकरणे जुळविण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदारांनी फिल्डींग लावली आहे. उपाध्यक्षपदाचा तिढा काहीअंशी सुटला असलातरी अध्यक्षपदाचे प्रतिनिधीत्व धनगर समाज की लोणारी समाजाला द्यायचे यावर राष्ट्रवादीचे विचारमंथन सुरू आहे.
अध्यक्षपदासाठी सुभाष नरळे, शिवाजीराव शिंदे, आनंदराव शेळके-पाटील यांच्याच नावाची चर्चा आहे. मात्र, ऐनवेळी रामराजेंनी जर दबावतंत्र वापरलेतर माणिकराव सोनवलकर यांचे नाव पुढे येऊ शकते. तरीही रविवारी, दि. २१ रोजी सकाळी येणारा बारामतीचा ‘लिफाफा’ अध्यक्षपदाचा दावेदार ठरविणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष निवड राष्ट्रवादीची गोची करणार असल्याचे सध्यातरी दिसते. जिल्ह्यातील काही मतदारसंघातील राष्ट्रवादीचा राजकीय पाया जातीय समीकरणावर आधारित आहे. कोरेगाव, सातारा वगळता उर्वरित वाई, फलटण, माण मतदारसंघात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा परिणाम निश्चित दिसणार आहे. वाई मतदारसंघात पुन्हा एकदा अध्यक्षपद दिले तर अडचणीचे ठरणार आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे राष्ट्रवादीकडे या प्रवर्गाचे शिवाजीराव शिंदे, सुभाष नरळे, मानसिंगराव माळवे, आनंदराव शेळके-पाटील, शिवाजी गावडे, किशोर ठोकळे, माणिकराव सोनवलकर, सुनंदा राऊत, कविता गिरी, जयश्री बोडके हे सदस्य आहेत. मात्र, सध्यातरी यापैकी तिघेच आघाडीवर आहेत.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे, परिणामी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चारही सभापती त्यांचेच असणार आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रविवार, दि. २१ रोजी होणार आहे. माण, वाई आणि फलटण मतदारसंघापैकी एकाच्या गळ्यात अध्यक्षपदासाठी माळ पडणार आहे. अध्यक्षपदाच्या स्पर्धेत सुभाष नरळे यांच्यासाठी माजी आ. सदाशिवराव पोळ तर शिवाजीराव शिंदेंसाठी राष्ट्रवादीची टीम कार्यरत आहे. राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी हा प्रयोग येथे अमंलात येऊ शकतो. खंडाळा पंचायत समिती सभापतिपद खुल्या प्रवर्गासाठी असताना येथे रमेश धायगुडेंना बसविल्याने आनंदराव धायगुडे-पाटील यांचे नाव मागे पडले आहे. माणिकराव सोनवलकर यांच्यासाठी रामराजे आग्रही राहणार आहेत. अंतिम क्षणी बारामतीकर काय निर्णय घेतात, यावरही अवलंबून आहे.
अमित कदम उपाध्यक्षपदासाठी निश्चित असलेतरी बाळासाहेब भिलारे, रवी साळुंखे यांनीही दावा केला आहे. उदयनराजे साळुंखेंसाठी आग्रही आहेत. भिलारेंनी बरीच वर्षे उपाध्यक्ष होते. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडणार आहे. उपाध्यक्षपदी निवड नाही झालीतरी निदान सभापतिपद मिळावे, म्हणूनही प्रयत्न सुरू आहेत. पाटणमध्ये राष्ट्रवादीची आजची परिस्थिती लक्षात घेता संजय देसाई यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. राहूल कदम, विजयमाला जगदाळे, वैशाली फडतरे यांचीही नावे सभापतिपदासाठी चर्चेत आहेत.

अभी नही तो कभी नही...
माण तालुक्याला आजअखेर जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळालेले नाही. मात्र, आता संधी आली असून ती वाया जाऊ देता कामा नये म्हणून ‘अभी नही तो कभी नही..’ असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी सरसावले आहेत. माणमधून शिवाजीराव शिंदे आणि तानाजी नरळे यांनी प्रयत्न चालविले आहेत. तर दुसरीकडे माणमध्ये असणाऱ्या लोणार समाजानेही शड्डू ठोकून अध्यक्षपद नाही मिळालेतर राष्ट्रवादीला मतदान न करण्याची शपथ माण तालुक्याने घेतली आहे. माणमध्ये लोणार समाजाचे वीस हजार मतदान आहे.दरम्यान, आ. बाळासाहेब पाटील आणि आ. प्रभाकर घार्गे यांनी मानसिंगराव माळवे यांच्यासाठी आग्रह धरला, मात्र बारामतीकरांनी तो धुडकावून लावला असल्याचे सांगण्यात येते.

राष्ट्रवादी नेत्यांची गोची
अध्यक्ष निवडीचा परिणाम विधानसभा निवडणुकीत प्रकर्षाने होणार असल्यामुळे राष्ट्रवादीची गोची झाली आहे. धनगर समाज आरक्षणावरून राष्ट्रवादीला शक्यत तितक्या प्रमाणात अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला आहे. या समाजाची वाई मतदारसंघात ३५ हजार, माण-खटावमध्ये ४२ हजार तर फलटण मतदारसंघात ४५ हजार मतदान आहे. त्यामुळे याच समाजाला अध्यक्षपद मिळावे, यासाठी रामराजे नाईक-निंबाळकर, मकरंद पाटील आग्रही आहेत.

Web Title: Fielding of MLAs to vote for votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.