उत्सव दिव्यांचा अन् विद्युत रोषणाईचा!

By Admin | Updated: November 13, 2015 23:43 IST2015-11-13T22:11:09+5:302015-11-13T23:43:35+5:30

जयहिंद गणेशोत्सव मंडळ : दीड हजार पणत्यांतून दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश; गोंदवले, वडूथमध्येही दीपोत्सव

Festive lights and electric lighting! | उत्सव दिव्यांचा अन् विद्युत रोषणाईचा!

उत्सव दिव्यांचा अन् विद्युत रोषणाईचा!

सातारा : आपला देश विविधतेने नटला आहे. वेगवेगळ्या जाती-धर्मांचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र, अलीकडच्या काळात काही समाजकंटक धार्मिक तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा येथील तेलीखड्डा परिसरातील जयहिंद ग्रुपतर्फे पाडव्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत दीपोत्सव साजरा केला.
जयहिंद गणेशोत्सव मंडळाचे हे नववे वर्ष आहे. या मंडळाने आजवर त्या-त्या वर्षातील सामाजिक घटनांवर आधारित संदेश देणारे दीपोत्सव साजरा केला. हीच परंपरा या मंडळाने यंदाही कायम ठेवली आहे. जयहिंद गणेशोत्सव मंडळाचा गणपती हा साताऱ्यातील मानाचा पहिला गणपती मानला जातो. गणेशोत्सव काळातही मंडळ सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे.
तेलीखड्डा परिसरात हिंदू, मुस्लिम, बौद्ध धर्माचे लोक एकत्र येऊन सर्व सणवार साजरे करत असतात. यंदा राष्ट्रीय एकात्मता जपणारा दीपोत्सव साजरा करण्यात आला. चाळीस बाय चाळीस फूट जागेत रांगोळी काढण्यात आली होती. एका गोल वर्तुळात चार हात एकत्र येऊन एकमेकांचे मनगट पकडून मजबूत पकड या रांगोळीतून साकारली होती. त्याखाली ‘हिंद देश के निवासी, सभीजण एक हंै...’ असा संदेश दिला होता.
या दीपोत्सवासाठी दीड हजार पणत्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, मंडळाने यासाठी कोणताही खर्च केला नाही. मंडळांनी तारीख व वेळ जाहीर केली होती. त्यांनी डिझाईन तयार करून दिली होती. मात्र, परंपरेनुसार गल्लीतील सर्व घरातील महिलांनी घरातूनच पणत्या, वाती, तेल आणले होते, अशी मािहती जयहिंद ग्रुपचे अध्यक्ष बिपीन दलाल, नीलेश पंडित यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जयहिंद मंडळातर्फे दरवर्षी सामाजिक विषयावर दिपोत्सव साजरा केला जात असल्याने तो पाहण्यासाठी सातारा शहरातील नागरिकांनी रात्री गर्दी केली होती. (प्रतिनिधी)


आठ वर्षे जपली सामाजिक बांधिलकी
जयहिंद मंडळाचे हे आठवे वर्ष असून, आजवर मंडळाने सामाजिक संदेश देणारे दीपोत्सव साजरे केले आहेत. यामध्ये फटाके टाळू निसर्ग सांभाळू (२००७), जोती जोतीने सूर्य बनवूया! (२००८), ग्लोबल वॉर्मिंग (२००९), पुष्पपठार (कास )वाचवा (२०१०), लेक वाचवा (२०११), भ्रष्टाचाराचे ग्रहण (२०१२), व्यर्थ न हो बलिदान - शहीद नरेंद्र दाभोलकर (२०१३), चला अमंगळातून मंगळाकडे - भारताची मंगळ यान मोहीम (२०१४) यासारखे विषय हाताळले आहेत.
या वर्षीच्या दीपोत्सवातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. जयहिंद मंडळातील सर्व लहान मोठ्या कार्यकर्ते व महिलांनी यासाठी
विशेष परिश्रम घेतले.


‘महावितरण’ला तीस लाखांचा ‘बोनस’
सातारा : अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजेच दिवाळी. वसुबारसपासून सुरू झालेल्या दिवाळीला संपूर्ण शहर उजळून गेला आहे. शाहूनगरीला उजळून दिसण्यासाठी शहराला भर दिवसा अतिरिक्त दोन मेगावॅटचा विजेचा अधिक वापर लागला आहे. त्यातून महावितरणला लाखोंचा नफा होणार आहे. त्यामुळे वीज कंपनीला सातारकरांनी २५ ते ३० लाखांचा बोनसच आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील वसाहती, घरे, दुकानांवर विद्युत रोषणाई केली आहे. विशेष म्हणजे, इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात रात्री उशिरापर्यंत विद्युत माळा लावून ठेवलेल्या आहेत.
सातारा शहराची दररोजची दिवसा सरासरी सात मेगावॅट विजेची मागणी असते. दिवाळीत ही मागणी वाढली असून, ती दोन मेगावॅटने वाढून नऊवर पोहोचली आहे. त्यामुळे या पाच दिवसांत सरासरी दहा मेगाव्हॅट विजेचा वापर झाला आहे. यातून सरासरी २५ ते ३० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
दिवाळी सणात सातारकरांच्या आनंदावर विरजन पडू नये म्हणून वीजवितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अमित बारटक्के यांच्या नेतृत्त्वाखाली वीजवितरण कंपनीचे कर्मचारी अहोरात्र झटत होते. त्यामुळे अखंड विद्युत पुरवठा मिळाला. (प्रतिनिधी)


औद्योगिक वसाहतीतून पुरवठा
दिवाळीत शक्यतो औद्योगिक वसाहतीस सुटी असते. याचा फायदा घेऊन शहराची गरज भागविण्यासाठी औद्योगिक वसाहतीतील वीजपुरवठा शहराकडे वळविण्यात आला होता. त्यामुळे शहरातील वीज वापराचा अतिरिक्त ताण वाढलेला नाही, अशी माहिती वीजवितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अमित बारटक्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Festive lights and electric lighting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.