हुल्लडबाजांकडून कासवरील कुंपण जमीनदोस्त
By Admin | Updated: July 8, 2017 21:58 IST2017-07-08T21:58:04+5:302017-07-08T21:58:04+5:30
रात्रभर धिंगाणा : जाळ्या पुन्हा उभ्या करण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न; १७० प्रशिक्षणार्थी लागले कामाला

हुल्लडबाजांकडून कासवरील कुंपण जमीनदोस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा स्थळ तसेच जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असणाऱ्या कास पठारावर बुधवारी रात्री मद्यपी, हुल्लडबाजी करणाऱ्यांकडून फुलांच्या संरक्षणासाठी २०१२ मध्ये उभारण्यात आलेल्या सिमेंटचे खांबापैकी चाळीस खांब तोडून, संरक्षक जाळी जमीनदोस्त करून तसेच स्वच्छतागृहाच्या दरवाजाची तोडफोड करून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले.
दरम्यान, संरक्षक जाळ्या तसेच खांब तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा उभे करण्यासाठी वनविभाग कर्मचाऱ्यांकडून तसेच कास पठारावर अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या वनविभागाच्या प्रशिक्षण विद्यालयाच्या १७० कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या कास पठारावर सध्या सर्वत्र हिरवाई तसेच सर्वाधिक उंचीचा वजराई धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधू लागला आहे. शनिवार, रविवार अथवा सलग सुटी असल्यावर पर्यटकांची पर्यटनासाठी मोठ्या संख्येने गर्दी लागली आहे.
येत्या काही महिन्यांतच रंगीबेरंगी फुलांचा गालिचा पाहण्यासाठी जिल्हा, राज्य तसेच देशभरातून पर्यटकांचे वेध कास पठारावर जाण्यासाठी लागलेले असताना तत्पूर्वीच मद्यपीकडून कास पठारावर फुलांच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेले सिमेंटचे खांब व संरक्षक जाळ्या तोडून मोठ्या प्रमणावर नुकसान केले आहे. येत्या हंगामात फुलांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये, यासाठी पुन्हा खांब उभे करण्यासाठी वनविभाग कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
कारवाईची मागणी...
उन्हाळ्यात कास पठार परिसरातील हिरवाईला वणव्याची कीड लागू नये, यासाठी वनविभाग तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र पहारा दिला होता. वणव्यापासून पठाराचे नुकसान होऊ नये, यासाठी दिलेला पहारा अत्यंत स्तुत्य होता. परंतु बुधवारी पठारावर घडलेल्या विघातक घटनेने विघ्नसंतोषी लोकांच्या हुल्लडबाजीला वनविभाग चाप कसा बसवणार, हा प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडत असून, अविवेकी विघ्नसंतोषी लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यटक, पर्यावरणप्रेमींतून होत आहे.
बुधवारी रात्री पठारावर मद्यपी तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांकडून संरक्षक जाळ्या तसेच सिमेंटचे खांब मोडून झालेल्या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, या घटनेचा तपास सुरू आहे.
- श्रीरंग शिंदे, वनपाल, बामणोली