मारामारीप्रकरणी चाळीस जणांवर गुन्हा
By Admin | Updated: August 28, 2015 22:39 IST2015-08-28T22:39:41+5:302015-08-28T22:39:41+5:30
शेणोलीत तणावपूर्ण शांतता : आरोपींची धरपकड सुरू; गंभीर जखमींवर उपचार

मारामारीप्रकरणी चाळीस जणांवर गुन्हा
कऱ्हाड : शेणोली, ता. कऱ्हाड येथे सरपंच निवडीच्या कारणावरून उडालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी कऱ्हाड तालुका पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. त्यानुसार दोन्ही गटांतील एकूण ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू आहे. दरम्यान, धुमश्चक्रीत झालेला तलवारी हल्ला व हॉकी स्टिक, गजाने केलेल्या मारहाणीत एकूण अकराजण जखमी झाले आहेत. त्यापैकी पाचजणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत अमोल नामदेव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नारायण शिंगाडे, सर्जेराव भीमराव शिंगाडे, राजेश शिंगाडे, सागर शिंगाडे, बाजीराव शिंगाडे, अनिल शिंगाडे, विश्वास शिंगाडे, विजय शिंगाडे, राजेंद्र शिंगाडे, अंकुश शिंगाडे, श्रीरंग शिंगाडे, संदीप शिंगाडे, गणेश माने, अर्जुन माने, अशोक नलवडे, बाबा नलवडे, सचिन काशीद (सर्व रा. शेणोली) यांच्यासह अन्य दहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सरपंच निवडीच्या कारणावरून गुरुवारी सहा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी तलवार, लोखंडी गज व दगडाने मारहाण केली. त्यामध्ये अमोल पाटील यांच्यासह प्रमोद कणसे, दयानंद पाटील, मोहन कणसे हे जखमी झाले.याउलट रवींद्र अर्जुन इटकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमोल नामदेव पाटील, प्रताप पोपटराव कणसे, संदीप हिंदुराव पाटील, प्रमोद बाळासाहेब कणसे, सचिन पाटील, दयानंद बाजीराव पाटील, लालासाहेब पाटील, प्रशांत विजय पाटील, विजय यशवंत पाटील, शहाजी कृष्णा पाटील, सुहास हणमंत पाटील, मोहन भीमराव कणसे (सर्व रा. शेणोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा राग मनात धरून गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी तलवार, हॉकी स्टिक, लोखंडी गजाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत नारायण भीमराव शिंगाडे, सर्जेराव भीमराव शिंगाडे, सागर प्रकाश शिंगाडे, हणमंत सर्जेराव शिंगाडे, सतीश सर्जेराव शिंगाडे, राजेंद्र शंकरराव शिंगाडे, श्रीरंग बंडू शिंगाडे हे जखमी झाले आहेत. याबाबतची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
वाहनांचे नुकसान; पोलीस बंदोबस्त
मारामारीनंतर दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. यामध्ये दोन्ही गटांतील वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसान झालेल्या वाहनांमध्ये दोन टेम्पो, एक कार, दुचाकी तसेच एका कार्यालयाचा समावेश आहे.
शेणोली येथे गुरुवारी झालेल्या मारामारीच्या घटनेनंतर अद्यापही तणाव आहे. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर व पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी दिवसभर पोलीस परिसरात आरोपींची धरपकड करीत होते.