कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:39 IST2021-05-19T04:39:42+5:302021-05-19T04:39:42+5:30
सातारा : जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात कडक उन्हाळा असतो; पण यंदा उन्हाचे प्रमाण कमीच राहिले आहे. त्यातच ...

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला !
सातारा : जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात कडक उन्हाळा असतो; पण यंदा उन्हाचे प्रमाण कमीच राहिले आहे. त्यातच कोरोना लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच थांबत आहेत. परिणामी यंदा अजून तरी उष्माघात बळीची एकही नोंद जिल्ह्यात झालेली नाही.
सातारा जिल्ह्याचे दोन विभाग ओळखले जातात. पूर्वेकडील दुष्काळी भाग आणि पश्चिमेकडील बऱ्यापैकी समृद्ध असा पट्टा. जिल्ह्यात दरवर्षी मार्च महिन्यापासून ऊन जाणवायला सुरुवात होते. एप्रिलपासून तर कडक उन्हाळा असतो. पूर्व दुष्काळी भागात तर उन्हाची तीव्रता अधिक असते. सकाळी ९ पासून कडक उन्हाला सुरुवात होते. पश्चिम भागाचा विचार करता दरवर्षी कमाल तापमान सरासरी ४२ अंशांपर्यंत पोहोचते, तर पूर्व दुष्काळी तालुक्यात ४३ अंशांवरही तापमान गेल्याची नोंद झालेली आहे. यामुळे उष्माघाताने बळी जाण्याचाही प्रकार घडतो; पण गेल्या दोन वर्षांत उष्माघाताचा बळी गेलेला नाही.
यावर्षी तर जिल्ह्यात उन्हाळाच कमी आहे. त्यातच वळवाचा पाऊस सतत होत आहे. यामुळे कमाल तापमान कमी होत आहे. सध्या तर २६ अंशांपर्यंत खाली तापमान आलेले आहे. परिणामी यंदा कडक उन्हाळा जाणवलाच नाही, अशी स्थिती आहे.
चौकट :
तीन वर्षांतील उष्माघाताचे बळी
२०१९ ००
२०२० ००
२०२१ ००
..........................
ऊन वाढले तरी...
यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता खूपच कमी आहे. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात कमाल तापमान ४० अंशांवर अनेक वेळा जाते; पण यंदा ४० अंशांवर अद्याप गेलेले नाही. एप्रिल महिन्यात एकदाच ३९ अंशांवर तापमान होते, तर मे महिन्यात ३५ ते ३८ अंशांदरम्यान पारा राहिलेला आहे. सध्या तर वळवाचा पाऊस होत असल्याने कमाल तापमान आणखी कमी होऊन ३० अंशांच्या खाली आलेले आहे.
............................................
उन्हाळा घरातच...
कोरोन विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवाच सुरू आहेत. परिणामी बहुतांशी नागरिक हे घरातच थांबत आहेत. त्यामुळे बाहेर जाण्याचा प्रश्नच नाही. त्याचबरोबर ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू असली तरी उन्हाळा कमी असल्याने त्याची तीव्रता जाणवत नाही. शेतकरीही दुपारच्या वेळी घरी थांबतात आणि ऊन कमी झाले की शेतीची कामे करीत असतात. त्याचबरोबर ग्रामीण भागात उन्हाळी मजुरीची कामेही कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे.
कोट :
सातारा जिल्ह्यात यावर्षी उन्हाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल आणि मे महिन्यातही कमाल तापमान कमी राहिले. त्यातच वारंवार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाची तीव्रता अधिक जाणवली नाही. यावर्षी आतापर्यंत तरी उष्माघाताने जिल्ह्यात एकही बळी गेलेला नाही.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी
.............................................................