बिबट्याच्या तावडीतून पितापुत्र बचावले
By Admin | Updated: November 13, 2014 23:42 IST2014-11-13T23:36:07+5:302014-11-13T23:42:23+5:30
वीरवाडीतील घटना : उसाला पाणी पाजताना हल्ल्याचा प्रयत्न

बिबट्याच्या तावडीतून पितापुत्र बचावले
उंडाळे : अगदी जवळ आलेल्या बिबट्याच्या तावडीतून शेतकरी पितापुत्र बचावल्याची घटना वीरवाडी-पाटीलवाडी (ता़ कऱ्हाड) येथे घडली. गुरूवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी आरडाओरडा करीत बिबट्यावर बॅटरीचा प्रकाशझोत टाकल्यानंतर तो पसार झाला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वीरवाडी येथील काशिनाथ वीर व त्यांचा मुलगा प्रवीण हे दोघे गुरूवारी पहाटे आपल्या ‘जुगाई मंदिर’ नावच्या शिवारात गव्हाच्या पिकाला पाणी पाजण्यासाठी गेले़ पाणी देऊन झाल्यानंतर नजीकच असलेल्या उसाच्या शेताला पाणी लावण्यासाठी ते उसात गेले. त्यावेळी उसात दबा धरून बसलेला बिबट्या काशिनाथ व प्रवीण यांना बॅटरीच्या प्रकाशात दिसला़ त्यांना पाहताच बिबट्याने मोठ्याने डरकाळ्या फोडण्यास सुरूवात केली़ प्रवीणने बॅटरी चालू-बंद करत अवघ्या आठ फुटावर असणाऱ्या बिबट्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला़ मात्र, बिबट्याने पुढे येऊन दोघांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला़ काशिनाथ व प्रवीण यांच्या दिशेने झेपावलेला बिबट्या उसाला धडकल्यामुळे खाली कोसळला. याच वेळी काशिनाथ व प्रवीणने आरडाओरडा केला आणि उसातून बाहेर पळ काढला. सुमारे पंधरा मिनिटे हे थरारनाट्य सुरू होते. काशिनाथ व प्रवीण सुदैवाने सुखरूप बचावले. (वार्ताहर)
पंधरा दिवसांत दुसरी घटना
गेल्या आठवड्यात याच परिसरातील लटकेवाडीत रात्रीच्या वेळी एका धावत्या जीपवर बिबट्याने झेप घेतली होती. दरवाजाजवळ बसलेल्या प्रवाशांवर त्याने झडपही घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काही दिवसांतच घडलेल्या या दुसऱ्या घटनेमुळे शेतकरी दिवाससुध्दा शेतात जाण्यास घाबरत आहेत़