आषाढी एकादशीला ‘लेखणी’चा उपवास!

By Admin | Updated: July 15, 2016 22:41 IST2016-07-15T21:44:18+5:302016-07-15T22:41:03+5:30

जिल्हा परिषद : कर्मचारी कामावर हजर मात्र काम पडले बंद; जिल्ह्यातील सहाशे कर्मचाऱ्यांचा सहभाग

Fasting of 'Aakhadi Ekadashi' stanza! | आषाढी एकादशीला ‘लेखणी’चा उपवास!

आषाढी एकादशीला ‘लेखणी’चा उपवास!

सातारा : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत आषाढी एकादशीनिमित्त जणू ‘लेखणी’ने उपवास धरल्याचे चित्र पाहायला मिळाले. कर्मचारी कामावर हजर राहिले; मात्र त्यांनी आपली लेखणी बंद ठेवली. शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेबाहेर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर दुपारी दोन वाजता द्वारसभा घेण्यात आली. जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समित्यांमध्येही कामकाज ठप्प राहिले.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने हे लेखणी बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सातारा जिल्ह्यातही या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असून दि. १५ जुलैपासून जिल्हा परिषद व पंचायत समितीतील लिपिकवर्गीय कर्मचारी यात सहभागी होणार आहे. त्याचा दैनंदिन कामाजाला फटका बसला.
जिल्हा परिषदेच्या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभर संघटना मजबूत करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये गे्रड पे सुधारणा, प्रशासकीय बदल्यांचे अन्यायकारण धोरण, अतिकालिक भत्ता मिळणे, पदवीधर वेतन श्रेणी लागू होणे, निमशासकीय कर्मचाऱ्यांऐवजी शासकीय कर्मचारी म्हणून संबोधले जावे, अशा पंधरा मागण्या आहेत.
जिल्हाभरातील तब्बल ६०० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. सातारा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या लिपिकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने दि. १५ जुलैपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलनात राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी भाग घेतला असून, सातारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या सर्व कार्यालयातील कामकाज ठप्प झाले.
सकाळी कार्यालय सुरू होतेवेळी जिल्हा परिषदेतील तसेच इतर पंचायत समितीमधील सर्व लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वाराजवळ एकत्रित येऊन शासनाचा निषेध केला व हे आंदोलन का करावे लागत आहे. याबाबत काका पाटील, प्रशांत तुपे, जितेंद्र देसाई, नितीन खटावकर, विलासराव शितोळे, दिनकर चव्हाण, शिवाजीराव साळुंखे, चंद्रकांत मोरे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारी २ वाजता प्रवेशद्वाराजवळ एकत्रित येऊन शासनाचा निषेध केला. तसेच हे आंदोलन शासन मागण्या मान्यकरेपर्यंत बेमुदत सुरू राहणार असल्याचे संघटनेच्या नेत्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


कऱ्हाड-पाटणला प्रतिसाद
जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या लेखणी बंद आंदोलनाला कऱ्हाड व पाटण पंचायत समित्यांतील कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. कर्मचाऱ्यांनी दिवसभर प्रवेशद्वाराशेजारी ठिय्या आंदोलन करीत आमच्या मागण्या मान्य करा, अशा आशयाच्या घोषणा दिल्या. कऱ्हाडमध्ये तालुकाध्यक्ष राजेंद्र किळुस्कर, उपाध्यक्ष दीपक कराळे या पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी सहभागी झाले. पाटण येथे जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष भालचंद्र शिंदे यांच्यासह तालुकाध्यक्ष जवाहर पवार, संघटक इस्माईल अवटे, उपाध्यक्ष इलाई यांसह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला


अध्यक्ष-उपाध्यक्षांनी दिला पाठिंबा
राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या आंदोलनास महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तसेच जिल्हा परिषद कर्मचारी युनियन यानी पूर्ण पाठिंबा दिलेला असल्याने सर्व लिपिकवर्गीय कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, बांधकाम, ल. पा. अंगणवाडी आदी कायार्यातील लिपिकांकडील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. सातारा जिल्ह्यातील एकूण ७५० लिपिकवर्गीय कर्मचारी यामध्ये सामील झालेले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे व उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी आंदोलनावेळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची या सरकारची मानसिकता दिसत नाही. निवेदने देऊनही त्याची दखल घेत नाहीत. लाक्षणिक उपोषण केल्यानंतर सकारात्मक चर्चा केली; पण कार्यवाही काहीच नाही. त्यामुळे आता जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत लेखणी बंद आंदोलन मागे घेऊ नये, अशी कर्मचाऱ्यांचीच मागणी आहे.
- जितेंद्र देसाई, राज्य संघटक, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटना.

Web Title: Fasting of 'Aakhadi Ekadashi' stanza!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.