फलटण : कोरोनाचे संकटामध्ये शेतकरी कसातरी तग धरत असताना पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातून शेतकरीसुद्धा सुटला नाही. इंधन दरवाढीमुळे शेतीच्या मशागतीचे महत्त्वाचे साधन असणाऱ्या ट्रॅक्टरच्या मशागतीचे दर वाढले आहेत. शेतीचा वाढता खर्च आणि उत्पन्नाला मिळणारे बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जात आहे.
पूर्वी शेतीची अनेक कामे बैलाच्या साहाय्याने व्हायची. बैलांच्या मदतीने नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी अशी सर्व कामे केली जायची. घराच्या पुढे दावणीला बांधलेल्या बैलांच्या मदतीने भरपूर कामे व्हायची. प्रत्येक शेतकरी आपल्या दावनीला बैल ठेवीत आणि बैल नसेल तर तो शेतकरी नाही असं समीकरण तयार झालेलं होते. मात्र बदलत्या काळानुसार यांत्रिकीकरण आले. शेतात बैलांऐवजी ट्रॅक्टरचा वापर सुरू झाला.
ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचू लागला. अंग मेहनत वाचली. मात्र शेतीसाठी लागणारा खर्च वाढला. पेरणी, नांगरणी, कोळपणी, फवारणी, पीक वाहतूक करणे, रोटरी फिरवून गवत कापणे अशी सर्व कामे शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने होऊ लागले. पण डिझेलचे दर गगनाला भिडले आणि व्यवसाय करणाऱ्या ट्रॅक्टरमालकांना कामांचे दर वाढवावे लागले. डिझेल महाग झाल्यामुळे येणारा पैसा त्यात खर्च होत असल्यामुळे चार पैसे शिल्लक रहावे म्हणून मशागतीचे दर वाढवणे गरजेचे होते.
डिझेलचे भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वच क्षेत्रात त्याचा फटका बसत आहे. यातून शेती व्यवसायदेखील सुटला नाही. डिझेलचे दर वाढल्याने शेतीच्या मशागतीचे महत्त्वाचे साधन असणारे ट्रॅक्टरच्या मशागतीचे दर वाढले आहेत. शेतीचा वाढता खर्च आणि मिळणारे बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जात आहे. मागील वर्षी नांगरणी १२०० रुपये प्रति एकर होती. ती यावर्षी १६०० रुपये झाली आहे. रोटाव्हेटर मागील वर्षी ११०० रुपयांत होत असे मात्र आता १५०० ते १६०० रुपये मोजावे लागत आहेत.
चौकट :
बैलजोड्या ठेवणेही झाले अवघड
जास्त कष्ट न घेता झटपट कामे होत असल्याने शेती मशागतीला यांत्रिकीरणाची जोड मिळाली आहे. ट्रॅक्टरमुळे शेतीच्या कामांनाही वेग आल्याने शेतीकरिता ट्रॅक्टर महत्त्वाचे साधन झाले आहे. त्यामुळे शेतातील बहुतांश कामे ही सध्या ट्रॅक्टरवर अवलंबून आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे शेतीची मशागत आता परवडणारी नसली तरी काळानुरूप लाखांच्या घरात गेलेल्या बैलजोड्या ठेवणे सामान्य शेतकऱ्यांना परवडत नाही.
शेतातील फोटो वापरणे