शेतकऱ्यांनी मध संकलन व्यवसायाकडे वळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:43 IST2021-09-05T04:43:54+5:302021-09-05T04:43:54+5:30
रहिमतपूर : ‘मध संकलन हा कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवून देणारा उद्योग आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिरता देणाऱ्या या ...

शेतकऱ्यांनी मध संकलन व्यवसायाकडे वळावे
रहिमतपूर : ‘मध संकलन हा कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवून देणारा उद्योग आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिरता देणाऱ्या या शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे’, असे आवाहन आंतरराष्ट्रीय पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी केले.
रहिमतपूर येथील कवी गिरीश शैक्षणिक सांस्कृतिक केंद्रात मध संचनालय, महाबळेश्वर, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ आणि रहिमतपूर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मधमाशा प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपकार्यकारी संचालक बिपिन जगताप होते. यावेळी नगराध्यक्ष आनंदा कोरे, मध संचालनालय, महाबळेश्वरचे संचालक डी. आर. पाटील, अरूण माने उपस्थित होते.
डॉ. राजेंद्र शेंडे म्हणाले, ‘पर्यावरणाचा नाश करून पैसा कमावण्यापेक्षा निसर्गाचा आदर राखून जो पैसा मिळतो त्याचा आनंद वेगळाच असतो. तो आनंद आपल्याला मध संकलनातून मिळवता येईल. शेतकऱ्यांनी बदलत्या परिस्थितीनुसार शेतीपूरक व्यवसाय म्हणून मध संकलन या व्यवसायाकडे पाहणे ही काळाची गरज आहे. महाबळेश्वरनंतर रहिमतपूर येथे उपमध संचनालय होत असून, शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.’
बिपिन जगताप म्हणाले, ‘कोणताही उद्योग करायचा म्हटलं तर त्याला भांडवल, जमीन, पाणी, वीज, कामगार व दळणवळणाची साधने लागतात. मध संचालनालय व्यवसायाला फक्त इच्छाशक्ती लागते. शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ सर्वतोपरी सहकार्य करेल.’
आनंदा कोरे यांनी प्रास्तविक केले. विकास पवार यांनी सूत्रसंचालन केले तर किरण भोसले यांनी आभार मानले.
फोटो : रहिमतपूर येथे मध संकलनाचे प्रात्यक्षिक डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. (छाया : जयदीप जाधव)