वीज कंपनीच्या नवीन योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : ढोक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:37 IST2021-02-13T04:37:39+5:302021-02-13T04:37:39+5:30
मायणी : वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी नवीन दोन योजना सुरू केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरतील. तरी ...

वीज कंपनीच्या नवीन योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : ढोक
मायणी : वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी नवीन दोन योजना सुरू केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरतील. तरी सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अतिरिक्त कार्यकारी अभियंता
हणमंत ढोक यांनी केले आहे.
ढोक म्हणाले, ‘शेती पंपासाठी तातडीने नवीन वीज जोडणी देणे. ज्या शेतकऱ्यांना विद्युत मोटर जोडणी करावयाची आहे व ज्यांना पोलची गरज लागत नाही अशा शेतकऱ्यांनी अर्ज केला की त्याच दिवशी वीज कनेक्शन जोडून दिले जाईल. मात्र त्या डीपीवर विद्युत भार शिल्लक असणे गरजेचे आहे. वीज बिल माफी संदर्भामध्येही शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला गेला आहे. शेतकऱ्याचे आजपर्यंत थकीत असलेले रकमेवर जे व्याज अधिक दंड आकारले गेले आहे ते माफ करण्यात येणार आहे. मूळ मुद्दलाच्या ५० टक्के रक्कम भरल्यास त्यांचा मागील हिशेब पूर्ण करण्यात येईल. या योजनेमध्ये साधारणपणे शेतकऱ्याचा ६० ते ६५ टक्के फायदा होणार आहे. याशिवाय थकीत वीज बिल ज्या गावात भरले जाईल त्याच्या ३३ टक्के रक्कम त्याच गावातील नवीन खांब बसवणे, डीपी बसवणे, जागा विकत घेणे आदी विविध समस्या सोडवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. जमा रकमेचा विजेसाठी कसा विनियोग करावा हे त्या गावातील सरपंच, त्या कार्यकारी अभियंता वडूज व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या चर्चेतून व जनतेला विश्वासात घेऊन करण्यात येणार आहे..
मायणीसह धोंडवाडी, गुंडेवाडी व चितळी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपकार्यकारी अभियंता राजकुमार कलशेट्टी, मायणीचे सहायक
अभियंता विशाल नाटकर
उपस्थित होते.