तोड होणाऱ्या उसाचा खोडवा शेतकऱ्यांनी ठेवावा
By Admin | Updated: December 1, 2015 00:12 IST2015-11-30T22:04:20+5:302015-12-01T00:12:21+5:30
शिवेंद्रसिंहराजे : कोंडवे येथील शेतकरी मेळाव्यात आवाहन

तोड होणाऱ्या उसाचा खोडवा शेतकऱ्यांनी ठेवावा
सातारा : चालूवर्षी योग्य वेळी व योग्य प्रमाणात पर्जन्यमान न झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून, या अवर्षण परिस्थितीत चालू गळीत हंगाम २०१५-१६ मध्ये ऊस तुटून गेल्यानंतर पाण्याअभावी इतर कोणत्याही पिकाचे नियोजन शक्य नसल्यामळे ऊसतोडणी झाल्यावर फक्त ऊस पिकाचा जास्तीत जास्त खोडवा ठेवणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असल्याने तोड होणाऱ्या सर्व उसाचा खोडवा ठेवावा, असे आवाहन अजिंक्यतारा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार व संचालक मंडळाच्या आदेशानुसार अवर्षण परिस्थितीत ऊसपीक जोपासना व खोडवा पीक व्यवस्थापन या विषयावर कोंडवे येथे साखर कारखान्यामार्फत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
शिवेद्रसिंहराजे म्हणाले, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांनी तुटणाऱ्या सर्व उसाचा खोडवा ठेवावा तसेच पाचट आच्छादन करावे. खोडव्याचे ऊसविकास विभागाच्या मार्गदर्शनानुसार करावे. पुढील वर्षीच्या लागणीकरिता पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी ५ ते १० गुंठ्याचे बियाणे तयार करावेत. तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सोसायटीच्या माध्यमातून साखर कारखान्याचे साह्णाने ठिबक सिंचन करावे असे आवाहनही त्यांनी केली.
यावेळी फिनोलेक्स कंपनीचे डे. मॅनेजर व अॅग्रानॉमिस्ट विठ्ठल गोरे यांनी ऊसपीक लागवड व उसासाठी ठिबक सिंचन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कारखान्याच्या ऊसविकास विभागातर्फे ऊस खोडवा व्यवस्थापन, कमी पाण्यात खोडवा व्यवस्थापन, पाण्याची सोय नसताना दुष्काळातील खोडवा व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करून करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. (प्रतिनिधी)