ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:08 IST2021-02-05T09:08:55+5:302021-02-05T09:08:55+5:30
कुडाळ : कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाला. पुरेशा तोडणी यंत्रणेअभावी परिसरातील ऊस गेली १७ ते ...

ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ!
कुडाळ : कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाला. पुरेशा तोडणी यंत्रणेअभावी परिसरातील ऊस गेली १७ ते १८ महिने शेतातच उभा आहे. उसाला फुटलेले तुरेही पडू लागले आहेत. यामुळे उसाला लवकर तोड मिळावी, यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
कुडाळ आणि परिसरातील बहुतांश गावांमध्ये उसाचे क्षेत्र अधिक आहे. यावर्षी चांगल्या पर्जन्यमानामुळे उसाचे पीक जोमात आले होते. गतवर्षी जून-जुलै महिन्यांत लागण केलेल्या या उसाला आज १७ ते १८ महिने होत असून, तुरे फुटले आहेत. अशातच ऊसतोडणीसाठी कारखान्यांकडून पुरेशी यंत्रणा उपलब्ध न झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. उसाची वाढ आता पूर्ण झाली असून, लवकर ऊसतोड न मिळाल्याने उसाचे तुरे फुटून पडू लागले आहेत. परिसरात काही ठिकाणी कारखान्यांच्या थोड्याच टोळ्या उसाची तोड करीत आहेत. भागातील ऊसक्षेत्राचा विचार करता ऊसतोडणीची ही यंत्रणा पुरेशी नाही. यामुळे जून-जुलै महिन्यांत लागण केलेला ऊस आजही शेतात उभा दिसत आहे. उसाला तुरे आलेले असून, आतून पोकळ झाला आहे. यामुळे उसाच्या वजनात घट होणार असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. अशातच शेतकरी ऊसतोडणीसाठी स्लिपबॉय, टोळीच्या मुकादमाकडे हेलपाटे मारत फडाला लवकर तोड मिळावी, याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याकरिता कारखान्यांनी ऊसतोडणी वेळेत होण्यासाठी पुरेशी यंत्रणा द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
(कोट)
उसाच्या तोडण्यासाठी कारखान्यांकडून उशीर होत आहे. यामुळे ऊसतोड कधी होणार याची वाट पाहत आहे. तसेच खोडवा, निडवा उसाचे काय होणार ही चिंतेची बाब आहे. यात उसाला तुरे फुटल्याने आतून पोकळ झाला आहे. यामुळे वजन घटणार असून, याचा शेतकऱ्याला तोटा सहन करावा लागणार आहे. ऊसतोडणीसाठी टोळ्या कमी असून, कारखान्यांनी तोडणीसाठी टोळ्यांची योजना करून ऊसतोड लवकर करावी.
-मुरलीधर नवले, शेतकरी
२७कुडाळ
फोटो : कुडाळ (ता. जावळी) भागातील उसाला तुरे फुटलेले आहेत. (छाया : विशाल जमदाडे)