वाई बाजार समितीवर शेतकऱ्यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:39 IST2021-03-16T04:39:47+5:302021-03-16T04:39:47+5:30
वाई : वाई बाजार समितीत काही दिवसांपूर्वी हळदीचे लिलाव पार पडले होते. त्यात हळदीला २९ हजार रुपयांपर्यंत दर दिला ...

वाई बाजार समितीवर शेतकऱ्यांचा मोर्चा
वाई : वाई बाजार समितीत काही दिवसांपूर्वी हळदीचे लिलाव पार
पडले होते. त्यात हळदीला २९ हजार रुपयांपर्यंत दर दिला गेला
होता. सध्या व्यापाऱ्यांकडे हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक
झाल्याने लिलाव बंद करण्यात आले. लिलावाची प्रक्रिया बंद
असल्याने सोमवारी शेतकऱ्यांनी वाई बाजार समितीवर मोर्चा काढला.
यावेळी सभापती लक्ष्मणराव पिसाळ यांनी या शेतकऱ्यांना लवकरच लिलाव
घेऊ, असे आश्वासन दिले.
याबाबत माहिती अशी की, वाईच्या बाजार समितीमध्ये हळदीला २९ हजार रुपये दर निघाला.
यामुळे बाजार समितीच्या आवारात सर्व व्यापाऱ्यांच्या अडत दुकानांवर आठ ते दहा हजार पोत्यांची आवक झाली आहे. मात्र, मागील एक महिन्यापासून लिलाव बंद आहेत. आठवडी बाजारात सोमवारमुळे लिलाव होतील, या अपेक्षेने मोठ्या संख्येने शेतकरी बाजार समितीत जमा झाले होते. बराच वेळ थांबल्यानंतरही लिलाव निघत नाहीत, असे दिसून आल्यावर व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त करत बाजार समितीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी बाजार समितीचे कर्मचारी व सदस्य व सभापती उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ यांच्याकडे दहा हजारांच्या पुढे बोली काढावी, तसेच लवकरात लवकर हळदीचे पैसे मिळावे, अशी मागणी केली. यावेळी सभापती लक्ष्मणराव पिसाळ यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन ताबडतोब लिलाव घेऊ, असे आश्वासन दिले.