टोमॅटोचे दर गडगडल्याने शेतकरी ‘लाली लाल’
By Admin | Updated: August 27, 2015 23:05 IST2015-08-27T23:05:52+5:302015-08-27T23:05:52+5:30
खंडाळा तालुक्यात दुहेरी संकट : भांडवल निघणेही मुश्किल

टोमॅटोचे दर गडगडल्याने शेतकरी ‘लाली लाल’
खंडाळा : यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाने दिलेली ओढ त्यामुळे शेतीपाण्याचा गंभीर बनत चाललेला प्रश्न आणि दुसरीकडे शेतीमालाचे गडगडलेले दर यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक बळ देणारं खरीप हंगामातील पीक म्हणून टोमॅटोकडे पाहिले जाते; परंतु यावर्षी टोमॅटोचे दर एवढे ढासळले की, पिकाचे घातलेले भांडवलही निघणे मुश्किल बनले आहे.जून महिन्यापासून येणारा मोसमी पाऊस आलाच नाही, पावसाने चांगलीच ओढ दिली. आता परतीच्या मान्सूनचाही तपास नाही. त्यामुळे चहू बाजूच्या विहिरी, तलाव आटू लागले आहेत. खरीप हंगामातील बहुतांशी पिकांची पेरणी झाली खरी; पिकांनी डोके वर काढण्याअगोदरच ती कोमेजली आहेत.खंडाळा तालुक्यातील बागायती पट्ट्यात विहिरींच्या पाण्यावर टोमॅटो, भेंडीसारखी नगदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात; परंतु यावर्षी टोमॅटोचे भाव पुरते ढासळले आहेत. प्रतिकिलो सरासरी पाच रुपये सुद्धा दर मिळेनासा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपले टोमॅटोचे फड अर्ध्यावरच सोडून दिले आहेत. पाऊसही नाही आणि दरही नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ना घरका ना घाटका, अशी झाली आहे. टोमॅटोच्या पिकासाठी लागवडीपासून ते फळधारणेपर्यंत हजारो रुपये खर्च करावे लागतात. एवढं करूनही खराब हवामान आणि कमी झालेले दर अशा दुहेरी संकटात बळीराजा अडकला आहे.
याशिवाय तालुक्यातील बाजरी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, भात, मका, वाटाणा, तूर, उडीद, मूग या पिकांचीही अवस्था दयनीय आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, शेतकरी चिंतातूर दिसत आहे. (प्रतिनिधी)
भेंडी व टोमॅटोला प्रतिवर्षी चांगला दर मिळतो; पण यावर्षी पाऊस नसल्याने टोमॅटोला दर नाही. ज्यावर्षी पाऊस जास्त त्यावर्षी दर अधिक अशी साधारण स्थिती असते. शेतकऱ्यांनी फड सोडून दिल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
- किसनराव ननावरे, आडतदार
दरवर्षी टोमॅटो पीक आम्ही घेतो. सरासरी १५ ते २० रुपये बाजारात दर मिळतो. त्यामुळे चांगले पैसे होतात; परंतु यावर्षी पावसाच्या अभावामुळे पाण्याची कमतरता आणि ढासळलेला दर यामुळे पूर्ण नुकसान झाले आहे. भांडवलाच्या खर्चाचे कर्ज डोईजड झाले आहे ते फेडण्यासाठी मार्गच उरला नाही.
- संपतराव नेवसे, शेतकरी