ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांचा उडतोय गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:45 IST2021-09-04T04:45:33+5:302021-09-04T04:45:33+5:30
कोपर्डे हवेली : सातबारावर पिकांची नोंदणी २०२१ ते २०२२ या महसुली वर्षापासून फक्त मोबाईलमध्ये ॲपच्याच माध्यमातून होणार आहे. त्यामुळे ...

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांचा उडतोय गोंधळ
कोपर्डे हवेली : सातबारावर पिकांची नोंदणी २०२१ ते २०२२ या महसुली वर्षापासून फक्त मोबाईलमध्ये ॲपच्याच माध्यमातून होणार आहे. त्यामुळे महसूल खाते प्रयत्न करत असताना त्यामध्ये मर्यादा येऊ लागल्या आहेत. हे कसे करायचे म्हणून शेतकऱ्यांच्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पिकांची नोंदणी करण्यासाठी गावोगावी शिकाऊ टीम देण्याची मागणी होऊ लागली आहे.
शेतकऱ्यांनी स्वत:च्या मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲप इन्स्टाॅल करुन प्रत्यक्ष शेतात जाऊन आपल्या शेतातील पिकांची माहिती या ॲपमध्ये योग्यरित्या अचूकपणे भरून पिकांचा फोटो काढून भरावयाची आहे. यानंतर तलाठी कार्यालयामार्फत आपल्या शेतातील पीक पेऱ्याची माहिती भरली जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:च माहिती भरणे गरजेचे आहे. एका रजिस्टर मोबाईलमध्ये जास्तीत जास्त २० शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंदविता येणार आहे. हा कार्यक्रम १५ ऑगस्टपासून ते १५ सप्टेंबरपर्यंतच महसूल खात्याच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. नंतर रब्बी हंगामातील पीक पाहणी सुरू होणार आहे.
याचे शेतकऱ्यांच्यासाठी अनेक फायदे आहेत. त्यामध्ये वेळेची बचत आणि हेलपाटे घालणे कमी होणार आहे. बॅंकेचे कर्ज घेताना अडचणी निर्माण होणार नाहीत. पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. पीक नोंदणी केली असेल तर त्या शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झाले असेल तर नुकसानभरपाई मदतीस पात्र असेल. शेतात जंगली प्राण्यांकडून नुकसान झाले तर जाहीर करण्यात आलेली मदत मिळणार आहे. जर आपण नोंदणी केली नाही तर आपले क्षेत्र पड म्हणून दाखविण्यात येईल. त्यामुळे पीक पाहणी नोंदणी होणे गरजेचे आहे.
पीक नोंदणीचा कार्यक्रम जाहीर होऊन पंधरा दिवस झाले तरी त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. तलाठी कार्यालय सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल नाहीत तर ज्यांच्याकडे आहेत, त्यांना नोंदणी कशी करायची हे जमत नाही. त्यासाठी गावागावातील शिकाऊ उमदवारांची ई-पीक पाहणी करण्यासाठी सुशिक्षित मोबाईलचे ज्ञान असलेली टीम तयार करून हा कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.
कोट
शेतकऱ्यांनी महसूल विभागाला सहकार्य करावे. आम्ही शेतकऱ्यांना शेतात जाऊन मार्गदर्शन करत आहोत. यामध्ये युवा शेतकऱ्यांचा सहभाग असणे गरजेचे आहे.
दादासाहेब कणसे, तलाठी, कोपर्डे हवेली.
एका ॲण्ड्रॉईड मोबाईलवर २० शेतकऱ्यांची ई-पीक पाहणीसाठी होऊ शकते. त्याच्याऐवजी १०० संख्या करण्यात यावी तसेच अजून ही पध्दत सुलभ आणि सुटसुटीत करण्यात यावी. त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे.
सचिन नलवडे... अध्यक्ष, जिल्हा रयत क्रांती शेतकरी संघटना
चौकट
ई-पीक पाहणी करताना येणाऱ्या अडचणी
अनेक शेतकऱ्यांकडे साधे मोबाईल, रेंजचा अभाव, अनेकांना ही पध्दत डोकेदुखी वाटत आहे. काहीवेळेस ॲप डाऊनलोड होत नाही. शेतकऱ्यांच्या एका शेत गट नंबरची नोंद झाली तर दुसऱ्या गट नंबरची नोंद होत नाही, अशाही तक्रारी आहेत.