बियाणे वाटपात भरडला शेतकरी

By Admin | Updated: November 11, 2014 00:03 IST2014-11-10T20:45:35+5:302014-11-11T00:03:50+5:30

पाटण : कृषी विभागाच्या कारभाराबाबत नाराजी

Farmers from the distribution of seed | बियाणे वाटपात भरडला शेतकरी

बियाणे वाटपात भरडला शेतकरी

पाटण : रब्बी हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांना सवलतीवर दिल्या जाणाऱ्या हरभरा बियाणे वाटपाला प्रात्यक्षिक व पॅकेज असे गोंडस शब्द जोडून वसुली करण्याची नामी युक्ती पाटणच्या कृषी विभागाने वापरली असून, यामध्ये सर्वसामान्य शेतकरी भरडला जात आहे. दुसरीकडे पुढारी, प्रतिष्ठित आणि वशिलेबाज शेतकऱ्यांना हेच बियाणे घरपोच पोहोचविण्याचे काम कृषी कर्मचारी करत असल्यामुळे कृषी विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम कृषी विभागामार्फत सुरू आहे. मात्र, असे बियाणे घ्यायचे असेल तर त्यासोबत कीटकनाशके, तुरडाळ असे साहित्य घेण्याची सक्ती केली जाते. याबाबत विचारले असता वसुलीचे पैसे शेतकऱ्याकडून घेतले जातात, असे सांगितले जाते. बियाणाबरोबर इतर साहित्य घेण्याची सक्ती कशासाठी, असा सवाल शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. देण्यात येणाऱ्या हरभरा बियाणासाठी कसलीही कागदपत्रे मागितली जात नाहीत. तर मग शेतकऱ्यांकडून केली जाणारी वसुली कशासाठी? या प्रकाराबाबत वरिष्ठांनी चौकशी करावी. (प्रतिनिधी)

रब्बी हंगामासाठी वाटप करण्यात येणारे हरभरा बियाणे शेतकऱ्यांना दिले जात आहे. त्यासोबत प्रात्यक्षिकासाठी कीटकनाशकाचे किट दिले जाते. त्याचा चार्ज द्यावा लागतो. मात्र, त्यापेक्षा जादा वसुली शेतकऱ्यांकडून केली जात असेल तर त्यांनी तक्रार करावी.
-आर. एम. मुल्ला,
तालुका कृषी अधिकारी, पाटण

वितरण पद्धत चुकीची
हरभरा बियाणे वाटपाबाबत संबंधित विभागातील कृषी सहायक यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. शासकीय सवलतीवर उड्या घेण्याचे काम केले जात आहे. वशिलेबाजाला फुकट आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला चिमटा काढून बियाणे वितरण करण्याची पद्धत अवलंबली जात आहे.

Web Title: Farmers from the distribution of seed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.