दत्ता यादव -- सातारा शेतकऱ्यांकडून बँकेचे कर्ज थकल्यानंतर बँका शेतकऱ्यांच्या मागे ससेमिरा लावतात. या कटकटीला कंटाळून अनेक शेतकरी अक्षरश: आत्महत्या करत आहेत. मात्र असे असताना दुसरीकडे हजारो कोटी रुपये थकवून उद्योजक विजय मल्ल्या देश सोडून निघून गेला. यापार्श्वभूमीवर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्याच; शिवाय शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणाऱ्या पोस्ट गेल्या आठवड्यात व्हॉट्स अॅप आणि फेसबूकवर पाहायला मिळाल्या.दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्रामध्येही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागत आहेत. परंतु दुसरीकडे मात्र या देशात घोटाळे आणि कर्ज थकविणाऱ्यांची संख्या मात्र वाढत आहे. याला सोशल मीडियाद्वारे नागरिक आपल्या भावना मोकळ्या करून शासनाला संदेश देत आहेत.स्प्रेक्ट्रम घोटाळा, आदर्श घोटाळा अशाप्रकारची ५० घोटाळ्यांची लिस्टच सोशल मीडियावर झळकत आहे. या लिस्टच्या शेवटी हे सर्व घोटाळे करणाऱ्या लोकांची संपत्ती शासनाने जप्त करावी आणि हा सर्व पैसा गोरगरीब जनतेसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी वापरावा, असे नमूद करण्यात आले आहे. उद्योजक विजय मल्ल्याने हजारो कोटी थकविले. बड्यांच्या कर्जाची वसुली करून शेतकऱ्यांची कर्जे फेडा, असा टोलाही शासनाला सोशल मीडियाद्वारे लगावण्यात आला आहे. नुकतीच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनाही अटक झाली. त्यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवरही अनेकांनी आपली मते मांडली. कोणी म्हणतेय द्वेषाने त्यांना गुंतविले तर कोणी म्हणतेय त्यांचाही ‘हात’ घोट्याळ्यामध्ये आहे. त्यांच्या समर्थकांनी राज्यात कुठे-कुठे आंदोलने केली, याची ठिकाणेही देण्यात आली आहेत. जेणेकरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने करावीत, हा उद्देश असावा.स्थानिक पातळीवरचे विषयही या आठवड्यात सोशल मीडियावर झळकले. पाटण तालुक्यातील भोंदूबाबाचा केलेला पर्दाफाशमुळे अंनिसच्या कार्यकर्त्यांची सोशल मीडियानेही दखल घेतली. अनेकांनी ही कारवाई योग्यच असल्याचे म्हटले. माण तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचे वर्णनही काही युवकांनी विदारक केले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी येऊ वाटत नाही. कारण पाणी नाही. शासनाने आमच्या भावना जाणाव्यात अन्यथा आम्हालाही पाण्यासाठी प्राण द्यावा लागेल, अशी भावनिक सादही आणि इशाराही सोशल मीडियाद्वारे शासनाला देण्यात आला आहे. अशा प्रकारच्या पोस्ट एकमेकांना फॉरवर्ड केल्या गेल्या. पक्षांना पाणवटे तयार करण्याचेही आवाहन करण्यात आले.ग्राहक दिनानिमित्त जनजागृती..जागतिक ग्राहक दिनाचीही सोशल मीडियानेही दखल घेतली. वस्तू व सेवांची खरेदी करताना घ्यायची दक्षता, फसवणूक झाल्यास दाद मागण्याचे मार्गदर्शन आदींची माहिती देणारी पोस्ट सोशल मीडियावर झळकली. दुकानदारांकडून आपली फसवणूक झाली तरी ग्राहक तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करतो. मात्र सोशल मीडिया चळवळीमुळे ग्राहक जागृत होऊ लागले आहेत.आठवड्यातील ठळक पोस्ट...गेल्या आठवठ्यात सोशल मीडियावर काही महत्त्वाच्या पोस्ट झळकल्या. त्यापैकी काही जनजागृती करणाऱ्या तर काही शासनाला इशारा देणाऱ्या पोस्ट पाहायला मिळाल्या ४राष्ट्रवादीमध्ये घडलयं बिघडलयं४पाण्यासाठी नागरिकांचे आंदोलन ४वनसंपत्तीचे रक्षण करण्याचे आवाहन४ पक्षांना पाणवटे तयार करण्याचे आवाहन४ पत्रकार, पोलिस, फौजी कायद्याच्या कचाट्यात४ गाव पातळीवरील सोसायटीमध्ये विजय मिळविल्यामुळे अभिनंदनाचा वर्षाव४ सातारकर उड्डाण पुलाच्या प्रतीक्षेत वरील संदेश एकमेकांच्या ग्रुपवर पाठविण्याचे आवाहनही करण्यात आले. आपल्याला पटलं असेल तरच हा मेसेज पुढे फॉरवर्ड करा, असा नवीन संदेशाचा फंडा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
बड्यांच्या थकबाकीतून फेडा शेतकऱ्यांचे कर्ज!
By admin | Updated: March 16, 2016 08:34 IST