शेतकऱ्याच्या कन्येचा नेमबाजीत डबलबार!
By Admin | Updated: February 6, 2015 00:44 IST2015-02-05T23:46:50+5:302015-02-06T00:44:00+5:30
मलकापुरात आनंद : राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्ण, एक कास्य पदक

शेतकऱ्याच्या कन्येचा नेमबाजीत डबलबार!
मलकापूर : राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग घेत मलकापूरच्या पूजा थोरातने ४०० पैकी ३९४ गुण मिळवत सुवर्ण पदक व २१ वर्षांखालील स्पर्धेत कास्यपदक मिळविले. शेतकऱ्याच्या कन्येने मिळवलेले हे यश उल्लेखनीय असेच आहे.
नॅशनल रायफल असोसिएशनच्या वतीने चौथ्या ‘गन आॅफ ग्लोरी’ या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ पूजा कुबेर थोरात ही येथील आनंदराव चव्हाण विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत आहे़ तिने या स्पर्धेत दहा मीटर वीपसाईड एअर रायफल शूटिंग क्रीडा प्रकारात पहिल्यांदाच सहभाग घेतला होता़ देशातील विविध राज्यांतून आलेल्या १८ वर्षांखालील स्पर्धकांवर मात करत तिने ४०० पैकी ३९४ गुण मिळविले. या स्पर्धेत तिला सुवर्णपदक मिळाले. तर याच प्रकारात २१ वर्षांखालील खेळाडूंमध्ये तिने कास्यपदकही पटकाविले़ घरची प्रतिकूल परिस्थिती असतानाही तुटपुंज्या साधनांच्या साहाय्याने घराच्या हॉलमध्येच सराव करून तिने हे राष्ट्रीय पातळीवरील यश मिळविले.या यशाबद्दल मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, अध्यक्ष पी़ जी़ पाटील, बी़ बी़ पाटील, तुळशीराम शिर्के, वसंत चव्हाण, आऱ आऱ पाटील, ए़ एऩ शिर्के, शिवाजीराव थोरात, जिल्हा रायफल असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैयालाल राजपुरोहित यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. क्रीडा प्रशिक्षक सारंग थोरात यांचे तिला मार्गदर्शन लाभले़ (प्रतिनिधी)
चांगल्या साधनांची आवश्यकता
मलकापूरसारख्या निमशहरी भागातील खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करत कऱ्हाडसह राज्याचे नाव उज्ज्वल करीत आहे़ मात्र, या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरण्यासाठी तेवढ्याच उच्च तंत्रज्ञानाच्या साधनांची अवश्यकता आहे़ त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने व सक्षम व्यक्तींनी पुढे येणे गरजेचे आहे़
प्रतिकूल परिस्थिती असतानाही या महागड्या खेळासाठी पालकांनी गन व पॅलेट जर्मनवरून उपलब्ध केले आहे़ अभ्यास सांभाळत योगासन, व्यायाम करणे व घराच्या हॉलमध्येच दररोज चार तास सरावाचे सातत्य राखल्यामुळे हे यश मिळविले़ यापुढील काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळविण्याचे उद्दिष्ट आहे़
- पूजा थोरात