मोदींच्या ट्रायलमुळे शेतकऱ्यांची फसवणूक !

By Admin | Updated: June 20, 2016 00:25 IST2016-06-20T00:25:01+5:302016-06-20T00:25:01+5:30

पृथ्वीराज चव्हाण : शेरे येथे विविध विकासकामांचे उद्घाटन; दुष्काळ निवारणासाठी शासन अपयशी

Farmers cheating due to Modi's trial! | मोदींच्या ट्रायलमुळे शेतकऱ्यांची फसवणूक !

मोदींच्या ट्रायलमुळे शेतकऱ्यांची फसवणूक !

कऱ्हाड : ‘केंद्र व राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारच्या पराभवाची कारणे अनेक आहेत. अनेक वर्षांच्या सत्तेविषयी लोकांमध्ये नाराजी होती. म्हणून देशात मोदींनी ट्रायल घेतली. मोदींनी अनेक दिवास्वप्ने दाखवली. काळा पैसा प्रत्येकाच्या खात्यावर जमा होणार म्हणून सांगितले. त्याहीपेक्षा शेतकऱ्यांची फार मोठी फसवणूक या सरकारने केली आहे. त्याच बरोबरीने राहून राज्य सरकारने दुष्काळ यशस्वी न हाताळता राज्याची बेअब्रू केली आहे,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
शेरे, ता. कऱ्हाड येथे बाजारकठडे तसेच मुस्लीम मशिदीच्या नूतनीकरणाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मदनराव मोहिते होते. आमदार आनंदराव पाटील, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, इंद्रजित चव्हाण, आदित्य मोहिते, गजानन आवळकर, सरपंच प्रदीप गावडे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता बी. व्ही. साखरे, व्ही. एम. पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘सन १९९१ मध्ये मला लोकसभेच्या निवडणुकीत काहींनी उघड तर काहींनी छुपा विरोध केला. परंतु सामान्य जनतेने मला राजकारणात तेथूनच संधी दिली. त्यामुळे मी इथंपर्यंत पोहोचू शकलो. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशाच्या बरोबरीने चालते. अशा राज्याचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीची पंतप्रधानपदाशी तुलना होते, हे चुकीचे नाही.’
यावेळी आमदार आनंदराव पाटील, मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मारुती निकम यांनी भाषणावेळी पृथ्वीराज चव्हाण व पतंगराव कदम यांच्या माध्यमातून गावामध्ये कोट्यवधींच्या अकरा विकासकामे झाली असल्याची माहिती दिली. सलीम मुजावर यांनी सूत्रसंचालन केले. सर्जेराव निकम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कोयना, खरेदी-विक्री संघ बुंदीच्या लाडूसारखा खाल्ला
गेल्या दोन दिवसांपूर्वी कोयना दूध संघ व खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाल्याची टिमकी प्रसारमाध्यमांमध्ये माजी आमदारांनी वाजवलेली दिसली. मात्र, बुंदीचे लाडू जसे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवल्यास त्याच्या कळ्या पडतात व त्या खाल्ल्याही जातात. अशाप्रकारे माजी आमदारांनी कोयना दूध संघ व खरेदी-विक्री संघ झाडून खाल्ला आहे, अशी टीका आमदार आनंदराव पाटील यांनी माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.

Web Title: Farmers cheating due to Modi's trial!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.