मीटर न बघताच शेतीपंपाचे बिल हातात...
By Admin | Updated: November 21, 2015 00:24 IST2015-11-20T21:21:37+5:302015-11-21T00:24:31+5:30
पाटण तालुका : ठेकेदाराचा मनमानीपणा; वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे उद्धट वर्तन

मीटर न बघताच शेतीपंपाचे बिल हातात...
मल्हारपेठ : वीजविरतण कंपनीने अजब कारभार केला असून मीटर न पाहताच शेतीपंप मालकास बिल दिले आहे. रिडिंग ठेकेदाराचा मनमानी कारभार तर वीजवितरण कर्मचाऱ्यांचे ग्राहकांशी उद्धट वर्तन यामुळे उरुल, ठोमसे बोडकेवाडीतील शेतीपंप असणाऱ्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पाटण तालुक्याने संपूर्ण राज्याला उजेडात आणले आहे. असे असताना येथेच समस्यांचा ससेमिरा का? असा प्रश्न पडला आहे. वीजवितरण कंपनीने ऐन सणासुदीच्या काळात शेतीपंप ग्राहकांस वीजबिलाचा अजब बोनस देऊन बळीराजाचं दिवाळंच काढलं आहे. शेतीपंप मालकांना विना रिडिंगचे भरमसाठ बिले देऊन ग्राहकांचं कंबरडंच मोडलं आहे. आता याचीच चर्चा परिसरात ऐकावयास मिळत आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी वीजवितरणच्या आधिकाऱ्याला धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन उंब्रजच्या वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही दिले आहे.
वीजवितरण कार्यालयाचा ग्राहकांना लोकाभिमुख सेवा देण्याचा मानस आसताना ग्राहकांना कायम त्रासच नशिबी आला आहे. दरमहा येणारे विजबिले भरतोय तोवर दुसरे हातात पडत असते.
भरमसाठ येणाऱ्या वीजबिलामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीला आला आहे.
कर्मचाऱ्याचा बेजबाबदारपणा, वीजबिल दुरुस्ती करताना ग्राहकांना होणारा त्रास पहिलं वेळेत भरलंय
तरी दुसरं बिल घरी पोहोच, आशा
एक ना अनेक संकटात शेतकऱ्यासंह सामान्य ग्राहक सापडला आहे. (वार्ताहर)
कसला हा कारभार ?
वीजवितरणचे कर्मचारी तर मीटर बदलणे, मीटर शिफ्टिंग करणे, नवीन कनेक्शनसाठी व पैशासाठी विनाकारण ताटकळत ठेवणे. यासाठी भरमसाठ पैशाची मागणी करून ग्राहकांची लूटमार करत आहेत. ठेकेदाराला वीजबिल रिडिंगचा ठेका संबंधित विभाग देत आहे. त्यांच्याकडूनच नियमांची पायमल्ली होत आहे. कर्मचारी व ठेकेदार यांच्यात तडजोडीच्या चर्चा तर कायम ऐकावयास मिळत असतात. मग याला वीजवितरणचा कसला कारभार म्हणायचा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.