बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST2021-09-07T04:46:01+5:302021-09-07T04:46:01+5:30
कऱ्हाड तालुक्यातील वाठार परिसरात कृष्णा व मांड या दोन नद्या असून वाठारसह मालखेड, जुने मालखेड, बेलवडे बुद्रुक, कासारशिंरबे, कालवडे, ...

बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी हवालदिल
कऱ्हाड तालुक्यातील वाठार परिसरात कृष्णा व मांड या दोन नद्या असून वाठारसह मालखेड, जुने मालखेड, बेलवडे बुद्रुक, कासारशिंरबे, कालवडे, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक असा मोठा बागायती शेतीचा परिसर आहे. त्यामुळे याठिकाणी शेतीसह अन्य कामासाठी शेतकऱ्यांची मोठी वर्दळ शेतात असते. काही दिवसांपासून सतत या परिसरातील शिवारात बिबट्याचे वारंवार होणारे दर्शन व हल्ले तसेच कृष्णा नदीपात्रात मालखेड येथे झालेले मगरीचे दर्शन यामुळे या परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी हवालदिल झाले आहेत.
वाठार येथे गडगा शिवार परिसरात तसेच परमपूक या शिवारात बिबट्याने श्वानावर हल्ले केल्याच्या घटना घडल्या. या वारंवार घडणाऱ्या घटना पाहता परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती हा मुख्य व्यवसाय या परिसरातील ग्रामस्थांचा आहे. त्यावरच अनेक जण उदरनिर्वाह चालवतात. मात्र, बिबट्याचे वारंवार होणारे दर्शन व हल्ले यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
याबाबत संबंधितांनी वनविभागास माहिती दिली. मात्र, वनविभागाने पाहणी करून ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वनविभागाने मानव तसेच मानवी वस्तीत बिबट्याने जीवघेण्या हल्ला करण्याच्या प्रतीक्षेत न राहता बिबट्यांना जंगलवासात सोडणे आवश्यक आहे. अन्यथा मानवी वस्तीत बिबट्याकडून हल्ला होण्याची दाट शक्यता परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. सध्याची परिस्थिती आणि वस्तुस्थिती पाहता बिबट्याचे या परिसरातील अनेक गावांत झालेले दर्शन हे भीतीदायक आहे. याबाबत त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी करत आहेत.
- चौकट
बिबट्याची दहशत
१) वाठारला दुचाकीस्वारावर हल्ल्याचा प्रयत्न.
२) बेलवडे बुद्रुकमध्ये श्वानावर हल्ला.
३) इतुली शिवारात मृत बिबट्या आढळला.
४) मालखेडला महामार्गावर वावर.