टेंभूच्या निधीसाठी शेतकरी आक्रमक

By Admin | Updated: August 12, 2014 23:16 IST2014-08-12T22:49:50+5:302014-08-12T23:16:51+5:30

देविखिंडीत आज आंदोलन : सांगोल्याकडे जाणारे पाणी अडविणार

Farmers aggressive for the development of the temple | टेंभूच्या निधीसाठी शेतकरी आक्रमक

टेंभूच्या निधीसाठी शेतकरी आक्रमक

विटा : दुष्काळी खानापूर तालुक्याला वरदान ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी टेंभू योजनेसाठी खानापूर तालुक्यातील सर्वाधिक जमीन संपादित झाली असतानाही शासनाने टेंभूच्या टप्पा क्र. ४ व ५ साठी निधी उपलब्ध केला नाही. त्यामुळे खानापूर तालुक्यातील टप्पा क्र. ४ व ५ च्या लाभक्षेत्रातील शेतकरी संतप्त झाले आहेत. शासनाने सांगोला तालुक्यापर्यंतची टेंभूची कामे पूर्ण करण्यासाठी मंजूर केलेल्या ९९ कोटी ४० लाख रुपये निधीतील २५ टक्के रक्कम टप्पा क्र. ४ व ५ साठी देऊन टेंभूचे पाणी तामखडी घाटमाथ्यावर सोडावे, या मागणीसाठी बुधवारी दुपारी संतप्त शेतकरी देविखिंडी (ता. खानापूर) येथील टेंभूच्या बोगद्याजवळ टेंभूचे पाणी अडवून आंदोलन करणार असल्याने पाटबंधारे विभागासह प्रशासनाचीही चांगलीच धावपळ उडाली आहे.
टेंभू योजनेसाठी खानापूर तालुक्यातील एक ते दीड हजार एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. ही योजना मूळची खानापूर तालुक्यासाठी असताना टप्प्या-टप्प्याने कामे न करता राजकीय मंडळींनी मतासाठी सांगोल्यापर्यंतची कामे एकदम हाती घेतली. त्यामुळे सर्वच ठिकाणी टेंभूची कामे अपूर्ण राहिली. खानापूर पूर्व भागाला पाणी देण्यासाठी शासनाने टप्पा क्र. ४ व ५ चा आराखडा तयार केला; परंतु या कामाला निधीच मिळाला नसल्याने हे काम पूर्ण होऊ शकले नाही.
त्यामुळे टप्पा क्र. ४ व ५ साठी मंजूर निधीतून २५ टक्के निधी द्यावा, अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी संतप्त शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, हजारो शेतकरी एकत्रित आले आहेत. हे सर्व शेतकरी बुधवारी दुपारी साडेबारा वाजता देविखिंडी येथे बोगद्याजवळ पाणी अडवून तीव्र आंदोलन करणार आहेत. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. (वार्ताहर)

आज (मंगळवारी) सकाळी ११ वाजता विटा तहसील कार्यालयात तहसीलदार सौ. अंजली मरोड, पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता राजेंद्र मोहिते, कनिष्ठ अभियंता खोत, शेतकरी सेनेचे भक्तराज ठिगळे, सुभाष गायकवाड, अरुण माने, ब्रम्हदेव बागल, सुरेश जाधव, रामभाऊ देशमुखे यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे मोहिते यांना चांगलेच धारेवर धरले. टप्पा क्र. ४ व ५ साठी कधी निधी देणार व कामे कधी सुरू करणार, याचा प्रथम खुलासा करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी बैठकीत केली; मात्र या दोन्ही टप्प्यांच्या कामासाठी आज बुधवारी आंदोलन करणारच असल्याचा पवित्रा संतप्त शेतकऱ्यांनी घेतला. त्यामुळे आंदोलकांचे मन वळविण्यात प्रशासनाला अपयश आले.

Web Title: Farmers aggressive for the development of the temple