दुष्काळी मातीत मोरांसाठी उभारले शेतकऱ्याने अन्नछत्र !

By Admin | Updated: June 26, 2016 00:33 IST2016-06-26T00:31:57+5:302016-06-26T00:33:28+5:30

म्हसवडमध्ये मायेचा ओलावा : सर्जेराव माने यांच्या शेतात सहा वर्षांपासून मोर, लांडोरसह इतर पक्ष्यांची हजेरी

Farmer raised food for peacocks in drought-hit soil! | दुष्काळी मातीत मोरांसाठी उभारले शेतकऱ्याने अन्नछत्र !

दुष्काळी मातीत मोरांसाठी उभारले शेतकऱ्याने अन्नछत्र !

सचिन मंगरुळे / म्हसवड
दुष्काळी माण तालुक्यातील माणसांबरोबरच पशुपक्ष्यांनाही चोचभर पाण्यासाठी, अन्नासाठी भटकंती करावी लागते. मोर व इतर पक्ष्यांचे अन्न व पाण्यासाठी सुरू असलेले हाल येथील प्रगतशील शेतकरी व माजी नगरसेवक सर्जेराव माने यांनी पाहिले अन् त्यांनी शेतात मोरांसाठी अन्नछत्रच सुरू केले. याठिकाणी गेल्या सहा वर्षांपासून मोर, लांडोर व इतर शेकडो पक्षी सकाळी व सायंकाळी हजेरी लावतात.
सर्जेराव माने हे धार्मिक वृत्तीचे आहेत. शहर परिसरातील गोर-गरिबांच्या कसल्याही अडचणी असतील तर सर्जेराव माने खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतात. ते माणसाबरोबरच पशुपक्ष्यांचीही काळजी घेतात.
शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर त्यांची शेती आहे. या परिसरात मोरांची पूर्वीपासून मोठी संख्या होती. परंतु गत सहा-सात वर्षांपासून मोरांची संख्या घटत चालल्याचे त्यांच्या लक्षात आले.
ही बाब माने यांना खटकली. त्यातून त्यांनी २०१० पासून शेतात दोन ठिकाणी मोरांसाठी अन्न व पिण्याच्या पाण्याची दोन वेगवेगळ्या ठिकाणी सोय केली. याठिकाणी दररोज दहा किलो धान्य यामध्ये गहू, तांदूळ, हरभरा, मका, ज्वारी, बाजरी, भुईमुगाच्या शेंगा अशा विविध धान्यांचे मिश्रण व पिण्यासाठी पाणी ठेवण्यात येते.
याठिकाणी अनेक मोर, लांडोरसह इतर पक्षीही मोठ्या संख्येने येतात. गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेले अन्नछत्र आजही अखंडपणे सुरू आहे. यामुळे या परिसरात मोरांची व इतर पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Web Title: Farmer raised food for peacocks in drought-hit soil!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.