शेतकरी कंगाल...दलाल मात्र होताहेत मालामाल !
By Admin | Updated: December 4, 2014 23:47 IST2014-12-04T21:25:32+5:302014-12-04T23:47:10+5:30
व्यवसायात गौडबंगाल : दूध खरेदी दरात कपात; विक्री दर मात्र वाढलेलेच

शेतकरी कंगाल...दलाल मात्र होताहेत मालामाल !
कमलाकर खराडे - पिंपोडे बुद्रूक -दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला दूध व्यवसायाचे गणितच सुटेनासे झाले आहे. हा व्यवसाय करणारा शेतकरी दिवसेंदिवस कंगाल होत चालला आहे. तर दुसरीकडे मात्र, दलाल मालामाल होताना दिसत आहेत. दूध खरेदीदरामध्ये प्रचंड घट झाल्यानंतरही त्याची विक्री किमंत मात्र तीच आहे. महिनोनमहिने दूधसाठा शिल्लक राहू शकत नाही. यावरुन या व्यवसायातील गौडबंगाल दिसून येते.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर निम्म्याहून अधिक कमी झालेले आहेत. पावडरचा साठा संस्थांकडे पडून राहत आहे. निर्यातीवर वाढीव अनुदान मिळाले पाहिजे. अतिरिक्त दूध संकलन होत आहे, हे व असंख्य प्रश्न दूध संस्थापुढे उभे असल्याचे भासवून दुधाच्या खरेदी दरामध्ये तब्बल चार रुपये प्रतिलिटर घट करण्यात आली. मात्र, पिशवीबंद दुधाचे विक्री दर मात्र जैसे थे आहेत. त्याचबरोबर या व्यवसायातील दलालांचे कमिशनही कमी झाल्याचे ऐकिवात नाही. याउलट आपला माल जास्त ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी वाढीव कमिशनचे गाजर दाखवून किरकोळ विक्रेत्यांना मालामाल होण्याची आयती संधीच दूध संस्थांनी उपलब्ध करुन दिलेली आहे.
सर्व यंत्रणा केवळ दूध उत्पादक शेतकऱ्याला भरडण्याचा प्रयत्न करीत आहेत. खरेदी दरामध्ये कपात करताना कोणत्याही संस्थेने आपल्या संकलन केंद्राचे कमिशन कमी केलेले नाही. संकलन केंद्रांना अतिरिक्त खर्चासाठी ही प्रतिलिटर प्रमाणे पैसे दिले जातात, आणि तोट्याचे गणित दिसू लागले की शेतकऱ्याच्या दुधावर डल्ला मारला जातो. हे कितपत योग्य आहे. बाजारात मिळणाऱ्या पिशवी बंद गाईच्या दुधाची किंमत प्रतिलिटर ४२ रुपये आहे. वितरकाला सुमारे चार रुपये कमिशन मिळते. सध्या गाईचे दूध २० रुपये प्रमाणे खरेदी होते. मग दूध संस्थेकडे दूध पोहोच करण्यापासून ते पिशवीत बंद करून ग्राहकांना देण्यापर्यंत तब्बल २० रुपये प्रतिलिटर वाढीव किंमत किरकोळ ग्राहकाला मोजावी लागते. दर कमी झाल्यावर विक्रीही कमी होताना दिसत नाही. फक्त दूध पावडर आणि अतिरिक्त दूध संकलन या गोष्टी पुढे करून उत्पादकाला वेठीस धरण्यात येत आहे.
धवलक्रांतीला चूना...
काही वर्षांंपूर्वी राज्यशासनाने हरितक्रांतीची घोषणा केली होती. राज्यातील सर्व शेती सिंचनाखाली आणून हरित क्रांतीचे ते स्वप्न होते. ते स्वप्न अजूनतरी स्वप्न्च राहिलेले आहे. कारण अजूनतरी हरितक्रांती प्रत्यक्षात आलेली नाही. याच धर्तीवर राज्य दूध उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण करण्याबरोबरच अग्रेसर करण्यासाठीही धवलक्रांतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, दूध संस्था आणि दूध भेसळ करणाऱ्यांमुळे प्रामाणिकपणे दूध उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला आणि त्याच्या प्रयत्नांना चूना लावण्याचे पातक दूध संस्था करीत आहेत. त्यामुळे धवलक्रांतीची केवळ घोषणाच राहू शकते. कारण या स्थितीत प्रामणिक शेतकरी तग धरू शकत नाही.
दुध संकलन केंद्रापासून त्यावर प्रक्रिया होऊन ग्राहकापर्यंत पोहोच करण्यासाठी एक लिटर दुधासाठी किमान आठ ते दहा रुपये खर्च येतो. त्याचबरोबर घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांचे कमिशन या सगळ्यांचा विचार करता सध्या तरी यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.
- डॉ. राजेंद्र महाडिक,
संकलन प्रमुख
दूध व्यवसायाचे अर्थकारण खूप अवघड झाले आहे. पशुधन जगवणे माणूस जगविण्यापेक्षा जड होत आहे. शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढणे अपेक्षित आहे. दूध संस्था फक्त शेतकऱ्याचाच नकळतपणे खिसा कापत आहेत. हे योग्य नाही.
- बाळासाहेब गार्डी, दुग्धउत्पादक शेतकरी, पिंपोडे बुद्रुक