शेतकऱ्याचा विळ्याने खून
By Admin | Updated: August 15, 2016 00:45 IST2016-08-15T00:45:34+5:302016-08-15T00:45:34+5:30
आंबेदरे येथील घटना : संशयित पोलिसांच्या ताब्यात

शेतकऱ्याचा विळ्याने खून
सातारा : बांधावर म्हैस चारण्यावरून झालेल्या बाचाबाचीतून सातारा तालुक्यातील आंबेदरे येथील ज्ञानदेव गोपाळ मोरे (वय ६५) यांचा गावातील संशयित रमेश बाजीराव मोरे (४५) याने विळ्याने वार करून खून केला. ही खळबळजनक घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. पोलिसांनी रमेश मोरेला रात्री उशिरा ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ज्ञानदेव मोरे आणि संशयित आरोपी रमेश मोरे हे शेजारी राहतात. त्यांच्या घराशेजारीच शेतीचा बांध आहे. या बांधावरून दोघांमध्ये अनेक वर्षांपासून वाद होता. शनिवारी दुपारी ज्ञानदेव मोरे हे त्यांची म्हैस चारण्यासाठी घराजवळच असणाऱ्या शेतात गेले होते. दुसऱ्या दिवशीही त्यांनी त्याच ठिकाणी म्हैस चारण्यासाठी नेली होती. याची माहिती रमेश मोरेला समजल्यानंतर तो ज्ञानेदव मोरेंना ‘माझ्या शेतात म्हैस का चारताय,’ असे विचारण्यासाठी गेला. यावेळी ज्ञानदेव मोरे यांनी ‘माझ्या शेतातच म्हैस चारतोय, तुला काय करायचे ते कर,’ असे त्याला सांगितले. त्यावर रमेश मोरे याने ‘तुला मारीन,’ अशी तंबी दिली. ज्ञानदेव मोरेंनी ‘ये बघू काय करतोयस,’ असे म्हटल्यावर रमेश मोरेने हातातील विळ्याने त्यांच्यावर सपासप तीन वार केले. त्यापैकी दोन वार त्यांच्या डाव्या पायावर केले. वार वर्मी लागल्याने त्यांच्या पायाची रक्तवाहिनी तुटली. ज्ञानदेव मोरे जागीच कोसळले. हा प्रकार घडला तेव्हा आंबेदरे गावात कोणीच नव्हते. भांगलणीच्या कामासाठी लोक शेतात गेले होते. सुमारे अर्धा तास ते जागेवरच पडून होते. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे ते बेशुद्ध पडले. शेतात गेलेल्या लोकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मोरे यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
ज्ञानदेव मोरे यांचा खून केल्यानंतर संशयित रमेश मोरे हा तेथून दुचाकीवरून पसार झाला होता. मात्र, स्थानिक गुन्हे शाखा आणि सातारा तालुका पोलिसांनी शोध मोहीम राबवून काही तासांतच त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी)