लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोना महामारीतून सावरण्यासाठी ईएसआयसीने कामगारांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. ईएसआयसीकडून नोंदणीकृत असणारा कामगार जर कोरोनामुळे मृत्युमुखी पडला तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना अवलंबित्व लाभ हा पेन्शन स्वरूपात मिळणार आहे.
ही योजना २४ मार्च २०२० पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल. ती २३ मार्च २०२२ पर्यंत योजना लागू असेल. यासाठी सदर कामगार कोरोनाचे निदान झालेल्या दिवसाआधी ३ महिने ईएसआयसीकडे नोंदणीकृत असावा. तसेच निदान झाल्यावेळी तो नोकरीवर असावा व त्याने कोविड पॉझिटिव्ह रिपोर्टच्या १ वर्ष अगोदर ७० दिवसांचे अंशदान भरलेले असावे.
पात्र कामगारांच्या कुटुंबीयांना सीआरएस हा अर्ज मृत्यू प्रमाणपत्र व कोविड पॉझिटिव्ह रिपोर्टसहित आपल्या ईएसआयसी शाखेमध्ये जमा करावा, असे आवाहन ईएसआयसीने केले आहे. अधिकची माहिती ईएसआयसीच्या संकेस्थळावर देण्यात आलेली आहे.
कोरोना महामारीत अनेक कामगारांना देखील गाठले. अनेक जण कोरोनाच्या रजेवर देखील गेले. अनेकांना मृत्यूने गाठले. अनेक कामगारांची कुटुंबे उघड्यावर पडली. या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी राहत योजना सुरू करण्यात आली. संबंधित कामगाराला जेवढे वेतन मिळत होते, त्याच्या ९० टक्के पगार प्रतिमाह कामगारांच्या कुटुंबीयांना दिले जाणार आहे. कामगारांच्या कुटुंबीयांनी दावा केल्यानंतर १५ दिवसांच्या आत संबंधित वारसाच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत.
कोट..
कोरोनाला बळी पडलेल्या विमीत कामगाराच्या पात्र कुटुंबीयांना या योजनेचा फायदा मिळेल. यासाठी संबंधित कामगाराच्या कुटुंबीयांनी तत्काळ अर्ज करावा.
-हेमंतकुमार पांडे, प्रभारी उपनिदेशक, पुणे विभाग