जिल्ह्यात शिक्षक परिषदेत धुसफूस! नेत्यांवर
By Admin | Updated: March 20, 2016 23:49 IST2016-03-20T22:09:55+5:302016-03-20T23:49:32+5:30
मनमानीचा आरोप : अनेकजण राजीनाम्याच्या पवित्र्यात; संघटनेला घरघर

जिल्ह्यात शिक्षक परिषदेत धुसफूस! नेत्यांवर
कऱ्हाड : प्राथमिक शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक समजला जातो. जिल्ह्यात शिक्षकांची संख्याही मोठी आहे. तितक्याच त्यांच्या संघटनांची यादीही मोठी आहे. सहा महिन्यांपूर्वी जिल्ह्यात शिक्षक परिषद नावाच्या संघटनेने यात भर टाकली; पण सध्या वैचारिक समन्वयाअभावी संघटनेत धुसफूस सुरू झाली असून, लवकरच संघटनेला खिंडार पडल्याचे पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. शिक्षकांच्या संघटना, असा उल्लेख केला की शिक्षक नेते शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात यांची नावे पश्चिम महाराष्ट्रात घेतली जातात; पण यांच्याच तालमीत तयार झालेल्या अनेकांना आपणही एखाद्या संघटनेचे नेते व्हावे, असे वाटू लागते. त्यामुळेच त्याचाच परिपाक म्हणून जिल्ह्यात सन २०१५ मध्ये शिक्षक परिषद नावाची नवी संघटना जन्माला आली. गेल्या सहा महिन्यांत यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करून काही तालुक्यांमध्ये संघटना बांधणीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, पूर्ण जिल्ह्यात बांधणी होण्याआधीच परिषदेत धुसफूस सुरू झाल्याने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. पाटण शिक्षक सोसायटीवर शिक्षक नेते संभाजीराव थोरात व जिल्हा चिटणीस महेंद्र जानुगडे यांच्या माध्यमातून राजेंद्र बोडके संचालक म्हणून निवडून गेले. संघटनेतील दुहीतून त्यांनी शिवाजीराव पाटील यांचे नेतृत्व माणणाऱ्या प्रदीप घाडगे यांना साथ दिली. मात्र, तेथेही त्यांचे मन न रमल्याने काही निवडक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन बोडके यांनी शिक्षक परिषद नावाची संघटना स्थापन केली. ही संघटना शिवाजी व संभाजी या गुरू-शिष्याच्या वादामुळे चांगली भरारी घेईल, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, आज परिषदेतील अंतर्गत नाराजीमुळे संघटनेला खिंडार पडण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा शिक्षक परिषदेचे नेते भगवान भुताडमल व जिल्हा कोषाध्यक्ष संतोष डवरे, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदेव मोरे, उपाध्यक्ष महादेव सांबरेकर, अशोक जाधव तसेच पाटण तालुका सरचिटणीस मुरलीधर चौरे, तालुका उपाध्यक्ष नागनाथ केंगार, सहसरचिटणीस रमेश बनकर, अनंत आघाव, संतोष बागडे आदी पदाधिकारी राजीनामा देण्याच्या पवित्र्यात आहेत. त्यांचे राजीनामे तयार असून, लवकरच ते संबंधितांकडे सोपविले जाऊ शकतात. त्यामुळे हे कार्यकर्ते कोणत्या ‘स्वगृही’ परतणार याबाबत शिक्षण वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतील नेते संघटनेच्या कार्यकारिणीला विश्वासात न घेता अनेक निर्णय घेत आहेत. ज्या कारणावरू न ही शिक्षक परिषद जन्माला आली. त्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम संघटनेत सुरू आहे. त्यामुळे माझ्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. - भगवान भुताडमल,जिल्हा शिक्षक परिषदेचे नेते