बुध : शेतकऱ्यांकडून कमी भावाने दूध विकत घेणारी दूध संकलन केंद्रे हेच दूध पाकिटातून ग्राहकांना ३५ ते ४५ रुपये दराने विकते. एका बाजूला दुधाचे दर कमी करून शेतकऱ्यांचे शोषण तर दुसऱ्या बाजूला हेच दूध पाकिटातून जास्त किमतीने विकून ग्राहकांचे शोषण सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शासनाने सर्वसामान्यांचे हे शोषण थांबवावे, असे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.बुध, राजापूर, डिस्कळ भागात अनेक तरूण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय सुरू केला आहे. नोकरी नसल्याने प्रसंगी कर्ज काढून गायी घेतल्या. चार पैसे मिळत असतानाच शासनाने दुधाचे दर अचानक आठ ते दहा रूपयांनी कमी केले. यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. दूध दरासाठी रान उठवणारी शेतकरी संघटना सत्तेच्या वळचणीला गेल्याने या दूधदरासाठी शेतकरी वर्गाची कैफियत कोण मांडणार, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.एकीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च वाढत आहे. पशुधनाची जोपासना करणे खर्चिक झाले आहे. शासनाने दूधदर कमी करून जनावरांच्या खाद्याचे दर वाढविले. वैरण, पेंड, मका, भुसा, खपरी पेंड याचे दर वाढले असल्यामुळे पशुधन जगविणे कठीण झाले आहे. याबाबत लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का आहेत, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. (वार्ताहर) मोठ्या आशेने कर्ज काढून दूध व्यवसाय सुरू केला; पण अचानक दर कमी झाल्याने फक्त हमाली करावी लागत आहे. आमचेच दूध शहरात पाकिटातून दुप्पट किमतीने विकले जात असताना पाकिटातील दुधाचे दर मात्र एक रूपयांनी कमी न करता शेतकऱ्यांच्या माथी हा अन्याय का, असा प्रश्न पडत आहे.- संदीप शिंदे, दूध उत्पादक शेतकरी
शेतकऱ्यांपेक्षा दुकानातील दूध झाले महाग
By admin | Updated: January 6, 2015 00:48 IST