फेसबुक अकाऊंट हॅकर अंधारातच
By Admin | Updated: October 16, 2014 22:51 IST2014-10-16T22:03:27+5:302014-10-16T22:51:05+5:30
तपास सुरुच : मनसे जिल्हाध्यक्षांचा दाखविला होता ‘शिवसेना-राष्ट्रवादी’ला पाठिंबा

फेसबुक अकाऊंट हॅकर अंधारातच
म्हसवड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष व माण विधानसभा मतदार संघातील उमेदवार धैर्यशील पाटील यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करून दि. १४ रोजीच्या रात्रीपासून बदनामीकारक छायाचित्रे व मजकूर अपलोड करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने कार्यकर्ते संतप्त झाल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष व माण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार धैर्यशील पाटील यांच्या नावाने फेसबुक अकाऊंट आहे. या अकाऊंटवर अज्ञाताने आक्षेपार्ह व बदनामीकारक छायाचित्र व मजकूर टाकला. या बाबतची माहिती मनसेचा कार्यकर्ता प्रशांत पाटील याने पाटील यांना फोनवरून दिली. त्यांनी हे फेसबुक अकाऊंट तपासून खात्री केली.त्यानंतर पाटील यांनी फेसबुक अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अज्ञाताने या अकाऊंटचा पासवर्ड बदलला असल्याने ते शक्य झाले नाही. अखेर पाटील यांनी दहिवडी पोलिसांत तक्रार दिली.
त्यानुसार माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवटे करत आहेत.या घटनेच्या मुळाशी जाणार असल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीत मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार आहे. या परिस्थितीत माझे फेसबुक खात्याचा गैरवापर करून मतदारांत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला गेला. मी शिवसेनेच्या व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याची खोटी माहिती यावर देण्यात आली. या प्रकणाच्या तळात जाणार आहे. दोषी व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे.
- धैर्यशील पाटील,
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
-दहिवडी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयटी अॅक्ट ६६ (अ) ४९९ (मदंवि अ) अशी कलमे लावण्यात आली आहेत. बदनामी करणाऱ्या कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
संशयित अद्यापही पडद्याआड
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या फेसबुकचा वापर करुन त्यांची बदनामी करणारा संशयित अद्यापही पडद्याआडच आहे. पाटील यांनी बुधवारी तक्रार दाखल केली होती. तक्रार देऊन ४८ तास उलटले असले तरी या संशयिताचा थांगपत्ता पोलिसांना लागलेला नाही. आपली बदनामी करण्यासाठी हितशत्रू वेगवेगळे फंडे राबवित आहेत. मात्र, बदनामी करणारे आता अत्यंत खालच्या थराला गेले असल्याचे पाटील यांनी सांगितले.