प्रत्येक ज्वालेत दिसत होता आप्तांचा चेहरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:38 IST2021-04-25T04:38:38+5:302021-04-25T04:38:38+5:30
कोविड रुग्णांवर अंतिम संस्कार पार पाडण्यासाठी टीम तयार केली. या टीममध्ये .... यांचा समावेश आहे. मनाने खमके तरीही सेवाभावी ...

प्रत्येक ज्वालेत दिसत होता आप्तांचा चेहरा!
कोविड रुग्णांवर अंतिम संस्कार पार पाडण्यासाठी टीम तयार केली. या टीममध्ये .... यांचा समावेश आहे. मनाने खमके तरीही सेवाभावी वृत्ती असणाऱ्यांची प्रशासनाने निवड केली. ‘तुम्ही जगणं महत्त्वाचं आहे, तुम्हाला काही झालं तर आम्ही काय करायचं, नोकरी सोडायची वेळ आली तरी चालेल; पण तुम्ही सोबत राहा,’ अशी मानसिकता कुटुंबीयांची असल्याने हे काम आपल्यावर सोपवलंय याची कल्पनाच काही दिवस अनेकांनी कुटुंबीयांना दिली नव्हती. प्रारंभी मृत्यूदर कमी असल्याने या कर्मचाऱ्यांना मृतदेह आला की कळवलं जायचं आणि मग त्यांचे काम सुरू व्हायचे. स्वत: बाधित न होता तो मृतदेह हाताळणं हे कसब यातील अनेकांनी पार पाडलं. मृतांच्या वाढत्या आकड्याने या कर्मचाऱ्यांनाही अक्षरश: हादरवलं. त्यामुळे कुटुंबाला कामाची कल्पना देऊन त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेऊन राहणं, लेकराबाळांना जवळ न घेणं, हे सगळं त्यांनी पाळलं.
कोविडने मृत्यू झालेल्या प्रत्येक कुटुंबाशी आमची नाळ जोडली गेली. सख्ख्या नात्यातील लोकांना जे करता आलं ते काम आमच्यावर सोपवलं गेलं आणि ते योग्य पद्धतीने कोविडबाधित न होता आम्ही पार पाडलं, हेच आम्हाला मृतात्मे आणि त्यांच्या नातेवाइकांचे मिळालेले आशीर्वाद आणि पुण्याचं संचित आहे, अशा भावना हे व्यक्त करतात.
चौकट :
एकदा डोळे भरून बघू तरी द्या की हो...!
कोविडने मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयीन सोपस्कार उरकल्यानंतर मृतदेह कैलास स्मशानभूमीकडे रवाना केला जायचा. नातेवाइकांना याची माहिती मिळाली की, रुग्णवाहिकेच्या आधी नातेवाईक येऊन थांबायचे. यातील प्रत्येकाला मृत व्यक्तीला शेवटचं बघण्याची इच्छा असायची. ते करणं शक्य नसल्याने त्यांचा हंबरडा या कर्मचाऱ्यांना हादरवून सोडायचा. अंत्यविधीचे शूटिंग करा, अशी विनंती करणारे, मृताच्या तोंडात टाकण्यासाठी पाच नद्यांचे, गंगेचे पाणी देणाऱ्या नातेवाइकांच्या भावनांचा आदर राखून या कर्मचाऱ्यांनी माणुसकी राखली.
कोट :
कोरोना बोगस आहे, पैसे उकळण्याचे धंदे आहेत, अशा गप्पा मारणाऱ्यांच्या घरात जेव्हा कोविड रुग्ण आढळतो तेव्हा त्यांना कोरोनाचे अस्तित्व किती भीतीदायक आहे हे कळते. चिलटमुंग्यांसारखी माणसं मरताना बघितलं की कोरोना दहशतवाद्यांपेक्षा भीतीदायक वाटतो. हा प्रसंग आपल्या आयुष्यात येऊ नये म्हणून आम्ही आरोग्य विभागाने सांगितलेली सर्व खबरदारी अद्यापही पाळत आहोत.
- कपील मट्टू, अंत्यविधी कर्मचारी
इंट्रो
घरात टीव्हीपुढं बसून राष्ट्रीय धोरणांवर गप्पा मारणारे... कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी काय करता येईल याची अक्कल पाजळवणारे... फेसबुकवर चर्चा घडविणाऱ्यांची चर्चा फार झाली... पण वर्षभरात न थकता, न कंटाळता आपापल्या डोक्यावरचं ठिगळ शिऊन कोरोनाला रोखण्यासाठी अनेक हात अविरत झटले. समाजात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून झटणाऱ्या या हातांना अवहेलनेचाही त्रास सोसावा लागला... कोणी त्यांच्या कुटुंबीयांना बाजूला सारले तर कोणी त्यांना सोसायटीत येण्यास मज्जाव केला... अशा परिस्थितीतही न थकता कार्यरत राहणाऱ्या घटकाची कोविड काळातील कामाची कहाणी खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी...!
.......................