ऊसतोड मजुरांचा संकटांशी सामना

By Admin | Updated: December 2, 2015 00:35 IST2015-12-01T22:15:51+5:302015-12-02T00:35:52+5:30

\दररोजच जिवाशी खेळ : बैलगाडीचा समतोल सांभाळण्यासाठी लोंबकळण्याचा धोकादायक प्रयत्न

Face with the crisis of sugarcane laborers | ऊसतोड मजुरांचा संकटांशी सामना

ऊसतोड मजुरांचा संकटांशी सामना

इरफान मुजावर--पट्टणकोडोली --बैलगाडीतून कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या ऊसतोड मजुरांना रस्त्यामध्ये अनेक संकटांशी सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या चढ-उतारामुळे गाडीचा बिघडलेला समतोल सांभाळण्यासाठी कधी स्वत:च ‘जु’ला लोंबकळावे लागत आहे; तर कधी गाडीचा वेग आवरण्यासाठी हातात लाकडी ओंडका घेऊन ब्रेक लावण्याचा धोकादायक प्रयत्न करावा लागत आहे. यातून आपल्या जिवावर बेतण्याची शक्यता माहीत असतानाही केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो मैलांवरून आलेले ऊसतोड मजूर कुटुंबासमवेत दररोजच जिवाशी खेळत आहेत.
ऊसतोड मजूर कारखान्यांना बैलगाडीतून ऊस वाहतूक करतात. कडाक्याच्या थंडीत ऊसतोड करून रखरखत्या उन्हात ऊस वाहतूक करताना या मजुरांपुढे अनेक समस्या आवासून उभ्या राहतात. बहुतांशी ऊस वाहतूक बैलगाडीतून केली जाते. साखर कारखान्यापर्यंत पोहोच होईपर्यंत वेगवेगळ््या धोक्यांना या गाडीवानांना सामोरे जावे लागते. शेतामधील रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा करणाऱ्या विद्युतवाहिन्यांचे जाळेच आहे. यातील काही ठिकाणी विद्युतवाहिन्या लोंबकळत आहेत. या वाहिन्यांना चुकवतच गाडीवानाला ऊस वाहतूक करावी लागते. या विद्युत वाहिन्यांचा थोडासा स्पर्शही त्यांच्या मृत्यूला आमंत्रण देणारा ठरू शकतो.
बैलगाडी डांबरी रस्त्यावर आली की, बैलांचे पाय घसरून गाडीला मोठा अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. कारखान्यापर्यंत जाईपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यात चढ-उतार असतात. यावेळी बैलगाडीचा समतोल बिघडतो. अशा प्रसंगात गाडीवान आपल्या बैलांचा कासरा अर्धांगिनीच्या हातामध्ये देऊन स्वत: खाली उतरून चढतीला बैलगाडीच्या ‘जू’लाच लोंबकळून गाडीचा समतोल राखण्याचा धोकादायक प्रयत्न करतो. तर उतरतीलाही गाडीचा वेग आवरण्यासाठी हातामध्ये लाकडी ओंडका घेऊन गाडीचा वेग नियंत्रित करावा लागतो. अशा सर्व धोक्यांना सामोरे जाऊनच ऊस वाहतूक करावी लागते. ऊस वाहतूक करताना गाडीवानाचे संपूर्ण कुटुंबच गाडीवर बसलेले असते. साधी एखादी चूकही कुटुंबाच्या जिवावर बेतण्याची शक्यता असतानाही हे ऊसतोड मजूर पोटासाठी धोकादायक परिस्थितीतही ऊस वाहतूक करतात.
ऊस वाहतूक करताना बैलांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी गाडीवानाला बैलांच्या मदतीसाठी खारीचा वाटा हा उचलावाच लागतो. तेही जीव मुठीत घेऊन. यातूनच अनेक अपघात होऊन अनेक बैलांचा मृत्यू झाला असून, अनेकजणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र, अशाही परिस्थितीत केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी गाडीवान हे धोकादायक पाऊल उचलत आहेत.


आधुनिक गाड्या द्या ! साखर कारखान्यांकडून ऊसतोड मजुरांना दिल्या जाणाऱ्या बैलगाड्या या जुन्या पद्धतीच्या आहेत. त्यामुळे बैलगाड्या तयार करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गाडीच्या बनावटीमध्ये योग्य तो बदल करणे गरजेचे आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करताना होणारे अपघात टाळता येतील.

Web Title: Face with the crisis of sugarcane laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.