गोदामातील धान्यावर खादाडांचा डोळा

By Admin | Updated: May 27, 2015 01:01 IST2015-05-26T22:47:52+5:302015-05-27T01:01:34+5:30

ढेबेवाडीत शासकिय धान्याचा काळाबाजार : पुरवठा यंत्रणेसह दलाल, धान्य दुकानदारांची साखळी; लाभार्थ्यांच्या पदरी निराशा

Eye of glutton in the warehouse | गोदामातील धान्यावर खादाडांचा डोळा

गोदामातील धान्यावर खादाडांचा डोळा

सणबूर : ढेबेवाडी येथील शासकीय गोदामातून प्रतिमहिना हजारो क्विंटल धान्याचा काळाबाजार सुरू असून लाखो रूपयांची उलाढाल होत आहे. हा सारा काळाबाजार गोडावून किपरसह पुरवठा विभागाच्या सहकार्याने होत असल्याची चर्चा ग्रामस्थांतून सुरू आहे. संबंधित विभगाचे अधिकारी व कर्मचारी धान्याचा काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे व दलालांचे खरे हितचिंतक आहेत. ढेबेवाडी येथे शासकिय गोदामात होणारा हा काळाबाजार रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज आहे.
ढेबेवाडी विभागाचा परिसर व्यापक आहे. या परिसरातील स्वस्त धान्य दुकानदारांना सोयीनुसार धान्यसाठा उपलब्ध व्हावा या हेतूने शासनाने ढेबेवाडी येथे गोदाम बांधले आहे. या गोडावूनमध्ये गोडाऊन किपर पदाची नियुक्ती केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विभागातील स्वस्त धान्य दुकानदारांना या गोडावूनमधून स्वस्त धान्याचा पुरवठा होतो. मध्यंतरी गोडाऊनच्या नुतनीकरणाचे काम सुरू असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना कऱ्हाडच्या शासकिय गोदामातून धान्यसाठा उपलब्ध केला जात होता. मात्र आता ढेबेवाडीतील गोडाऊनचे नुतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने पुन्हा विभागातील स्वस्त धान्य दुकानदारांना ढेबेवाडीतून धान्यसाठा उपलब्ध करून दिला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून या गोडाऊनमध्ये धान्याचा काळाबाजार राजरोसपणे सुरू आहे. काळाबाजार करणारे रॅकेट पुरवठा विभागासमोरील आव्हानच ठरत आहे. स्वस्त धान्य दुकानदार, दलाल, व्यापारी, संबंधित गोडाऊन किपर अशी मजबूत साखळी असल्याची चर्चा ग्रामस्थांतून होत आहे. त्यांचा एकमेकांवर प्रचंड विश्वास आहे. त्यातूनच गोडाऊनमधील स्वस्त धान्याचा काळाबाजार होत आहे. विभागातील स्वस्त धान्य दुकानदारांची लायसन्स दलालांच्या ताब्यात आहेत. ते दलाल आपल्या स्वता:च्या वाहनातून प्रतिमहिना स्वस्त धान्य दुकानदारांना धान्यसाठा पोहोच करत असतात.
एखाद्या स्वस्त धान्य दुकानदाराची १५ पोती गहू असली तर त्या दुकानदराला दलालांनी फक्त सात पोतीच द्यायची बाकी बाहेर खुल्या बाजारात चढ्या दराने विकायची, असा प्रकार येथे सुरू आहे. हे स्वस्त धान्य दुकानदारांच्या सहमतीने सुरू असल्याची चर्चा आहे. मग एखादा सर्व सामान्य माणूस शिधापत्रिकेवरील धान्य त्या रेशनिंग दुकानदाराके अणावयास जातो. तेव्हा संपले आहे, भरलेच नाही, कोटा कमी आला आहे. अशी उत्तरे मिळतात. पण भरलेला कोटा विभागाच्या सहकार्याने सुरू आहे का ? स्वत:चे खिसे गरम करण्याच्या नादात याकडे दुर्लक्ष होत आहे का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. काळाबाजार करणाऱ्यांवर आत्तापर्यंत कोणतीच कारवाई झाल्याचे दिसत नाही.
शासन स्वस्त धान्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करत आहे. ढेबेवाडी येथील शासकीय गोदामात प्रतिमहिना लाखो रूपयांचे धान्य येते. सरकार त्यावर लाखो रूपये खर्च करत असावे. प्रत्यक्षात स्वस्त धान्य दुकानदार स्वत:चे खिसे भरत आहेत व सर्वसमान्य जनतेच्या पदरी निराशा येत आहे. या परिस्थितीचे कोणालाच काहीही गांभीर्य नसल्याचे चित्र
आहे.
परिणामी सायकलवरून फिरण्याची ऐपत नसलेले काही स्वस्त धान्य दुकानदार व संबंधित दलाल आता महागड्या कारमधून फिरत आहेत. दलाल एवढे निर्ढावले आहेत की, दिवसा धान्याचा काळाबाजार सुरू आहे. (वार्ताहर)


प्रत्येक महिन्याला धान्याचा जो कोठा येतो त्याची तपासणी केली जाते. त्यामध्य अद्यापतरी फरक जाणवलेला नाही. मात्र, लाभार्थ्यांना काळाबाजार जाणवत असेल तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. तक्रारींचे निरसन करून संबंधितावर योग्य ती कारवाई करू.
- रवींद्र सबनीस, तहसिलदार, पाटण

उंदीर गायब; पण ‘बोके’ दबा धरून
ढेबेवाडीमध्ये असलेले हे गोदाम पुर्वी लहान होते. त्यामुळे येथे धान्याचा साठा कमी प्रमाणात होत होता. तसेच इमारत जुनी व पडकी असल्याने गोदामात उंदरांचाही सुळसुळाट झालेला. उंदरांकडून धान्याची पोती कुरतडली जात होती. तसेच धान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात केली जात होती. अशातच या गोदामाची दुरूस्ती करण्याबरोबरच वाढीव इमारतीसाठी निधी उपलब्ध झाला. त्यामुळे गोदामाची इमारत सुसज्ज तसेच मोठी झाली आहे. सध्या गोदामातील उंदीर गायब झालेत; पण ‘खादाड बोके’ येथे दबा धरून बसलेत.

Web Title: Eye of glutton in the warehouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.