आॅनलाइन खरेदी वाढूनही फुकट हमाली!
By Admin | Updated: August 27, 2015 22:58 IST2015-08-27T22:58:18+5:302015-08-27T22:58:18+5:30
कुरिअर अडचणीत : ई-मेल, व्हॉट्सअॅपच्या जमान्यात काम वाढलं; पण धंदा बुडाला

आॅनलाइन खरेदी वाढूनही फुकट हमाली!
जगदीश कोष्टी- सातारा प्रत्येक गावात चांगली बाजारपेठ, मोबाईल दुकानं असूनही आजची तरुणाई कपडे, शुज, मोबाइलपासून ते टीव्ही, फ्रिज आॅनलाइनच खरेदी करते. कुरिअरमुळे या वस्तू घरपोच मिळत असले तरी कुरिअर कंपन्या जवळजवळ फुकटच हमाली करत आहे. या वस्तू परत पाठवायच्या असतील तरच मोबदला मिळतो. पंजाबमधून भला मोठा शस्त्रसाठा भुर्इंजमध्ये आला. हव्या त्या व्यक्तींना तो मिळालाही; पण त्याची कानकुणही कोणाला लागली नाही. शस्त्रं अन् तेही चक्क कुरिअरने येऊ शकतो, हे समजल्यावर समाजातील प्रत्येक घटकाच्या भुवया उंचावल्या. एवढी बेजबाबदारपणे वाहतूक कशी काय केली जाते, हा प्रश्न उपस्थित होणं चुकीचं नाही. या घटनेमुळे कुरिअर व्यवसाय चर्चेत आला; पण या व्यवसायाची अवस्था वाटते तेवढी अलबेल राहिलेली नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाइल आला आहे. स्मार्टफोनच्या जमान्यात प्रत्येक काम सोपे झाले आहे. आॅनलाइन खरेदीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे या व्यवसायाला सुवर्ण झळाली आली आहे, असे वरवर वाटत आहे. मात्र, या वस्तूंचे बुकिंग दिल्ली, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, गुजरात येथून होत असते. त्यामुळे याचा फायदाही तेथीलच कुरिअर कंपन्यांना होत आहे. कुरिअर व्यावसायिकांची प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र संस्थान आहेत. प्रत्येक जिल्ह्याचा कारभार स्वतंत्र चालत असला तरी ते एकमेकांना जोडले गेले आहेत. त्यामुळे बुकिंग किती झाले त्यावर मानधन मिळते; घरपोच सेवेचे तुटपुंजे मानधन मिळत असल्याने महानगरे वगळता उर्वरित शहरांमध्ये जवळजवळ फुकटातच हमाली करावी लागत आहे. मूळ कागदपत्रे पोहोच करण्यासाठी वापर मोबाइलवर ई-मेल, व्हॉट्सअॅप आल्यामुळे अनेक कंपन्यांची नव्वद टक्के कामे ई-मेलद्वारे होते. त्यामुळे नोकरीचे नियुक्तीपत्रांपासून अनेक कामे मेलद्वारे कळविले जाते. त्यामुळे कुरिअरवाल्यांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. आता मूळ कागदपत्रे पोहोच करायची असतील तरच कुरिअरचा वापर केला जातो. सातारा जिल्ह्यातून दररोज पार्सल व पाकिटे मिळून सरासरी सहाशे बुकिंग होत आहे. रोजची बुकिंग चांगली होत असेल तरच हा व्यवसाय चालू शकतो. - सोनल बोधे, कुरिअर व्यावसायिक, सातारा