रेशनकार्ड आधार लिंकसाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST2021-02-06T05:13:16+5:302021-02-06T05:13:16+5:30
कऱ्हाड : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय अन्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांचे आधार अद्ययावतीकरण व कुटुंबातील ...

रेशनकार्ड आधार लिंकसाठी मुदतवाढ
कऱ्हाड : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय अन्य योजनेतील सर्व लाभार्थ्यांचे आधार अद्ययावतीकरण व कुटुंबातील किमान एका व्यक्तीचा मोबाईल नंबर नोंदणी करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यासाठी ३१ जानेवारीची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत वाढवून १० फेब्रुवारीपर्यंत करण्यात आलेली आहे. कऱ्हाडच्या पुरवठा विभागाकडून रेशनकार्ड आधार लिंक करण्याची कार्यवाही सुरू आहे. रेशन धान्य योग्य व मूळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी आधारकार्ड रेशनला लिंक करण्यात येत असून दिलेल्या मुदतवाढीपर्यंत शिधापत्रिका धारकांनी आधार लिंक करण्याचे आवाहन पुरवठा निरीक्षक गोपाल वासू यांनी केले आहे.
कऱ्हाड ते पाटण रस्ता चौपदरीकरण गतीने
कऱ्हाड : कऱ्हाड ते पाटण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. ठिकठिकाणी जोडरस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी दुभाजक उभारले जात आहेत. कऱ्हाडनजीकच्या वारुंजी फाट्यापासून सुपने गावापर्यंत रस्त्यावर साईडपट्ट्यांना पांढरे पट्टेही मारण्यात आले आहेत. काही अंतराच्या एका लेनचे काम अद्याप बाकी आहे. ते कामही येत्या काही दिवसांत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.
अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी
मलकापूर : येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या उपमार्गावर वाहनधारकांकडून अस्ताव्यस्तपणे वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊन वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. ढेबेवाडी फाट्यापासून कोल्हापूर नाक्याकडे येणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहनांचे अस्ताव्यस्तपणे पार्किंग केले जात आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलधारक त्रस्त
कऱ्हाड : येळगाव, ता. कऱ्हाड परिसरात सध्या वारंवार मोबाईल नेटवर्क खंडित होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. येवतीसह संपूर्ण विभाग अनेकदा आऊट ऑफ कव्हरेज होत असल्याने येथील इंटरनेटद्वारे केली जाणारी अनेक कामे खोळंबत आहेत. कऱ्हाड दक्षिण विभागातील डोंगरी विभाग म्हणून येवतीसह येळगाव परिसराची ओळख आहे. या परिसरातील ग्राहकांना सध्या मोबाईल असूनही वारंवार इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने मन:स्ताप सहन करावा लागत आहे. इंटरनेटअभावी बँकेतील पैसे ऑनलाईन पद्धतीने पाठविणे आदी कामे करता येणे मुश्किल बनत आहे.
ढेबेवाडी मार्गावर धोकादायक वळण
कुसूर : मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्यापासून ते ढेबेवाडीपर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळण आहे. या वळणांपैकी शिंंदेवाडी येथील वळण जास्त धोकादायक असल्याने या ठिकाणी रात्रीच्यावेळी अपघात होत आहेत. या वळणावर भरधाव वाहनांवरील चालकांचा ताबा सुटून वाहने नजीकच्या ओढ्यात जात आहेत. या ठिकाणी दिशादर्शक व सूचना फलक नाहीत. फलक लावण्यात आले नसल्याने रात्रीच्या वेळी दुचाकी वाहनांमध्ये अपघात होत आहे.