हिंगणेत स्फोट; कोरेगावात आग
By Admin | Updated: February 7, 2015 00:09 IST2015-02-06T23:50:53+5:302015-02-07T00:09:53+5:30
कामगार ठार : दोन्ही आगीत कोट्यवधींचे नुकसान; हिंगणे परिसर हादरला

हिंगणेत स्फोट; कोरेगावात आग
वडूज / कोरेगाव : माण तालुक्यातील बोथे येथील जिलेटिन स्फोटाच्या आठवणी ताज्या असतानाच खटाव तालुक्यातील हिंगणे परिसर आज, शुक्रवारी आणखी एका स्फोटाने हादरून गेला. येथे एका बायोडिझेल निर्मिती कारखान्यात लागलेल्या आगीनंतर झालेल्या स्फोटात सागर कृष्णा जगदाळे हा कामगार जागीच ठार झाला. दरम्यान, कोरेगावातही आज एका हँडलूम अँड फर्निचर दुकानात आगीचे तांडवनृत्य सुरू राहिले. दोन्हीही आगीत कोट्यवधींचे नुकसान झाले. हिंगणे येथे ‘खटाव-माण अॅग्रो प्रोसेसिंग’ हा बायोडिझेल तयार करणारा खासगी कारखाना असून, येथे कंपनीच्या टाकीला भीषण आग लागल्याने मोठा स्फोट झाला. यामध्ये येथे वेल्डिंग काम करणारा कामगार सागर कृष्णा जगदाळे (वय २७, रा. राजाचे कुर्ले) हा जागीच ठार झाला. हिंगणे येथील आगीनंतर झालेल्या स्फोटामुळे परिसर हादरला. यानंतर येथे लोकांची गर्दी वाढली. पोलीस कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आग रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. ती आटोक्यात आणताना अग्निशमन दलालाही कसरत करावी लागत होती. दरम्यान, या आगीत कारखान्याचे कोट्यवधींचे नुकसान झाले. घटनास्थळी आ. शशिकांत शिंदे, आ. प्रभाकर घार्गे यांनी भेट दिली आणि आढावा घेतला.
कोरेगावात जयराम डोंबे यांच्या ‘यश हँडलूम अँड फर्निचर’ दुकानाला लागलेल्या आगीत सहा ते सात लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, घटनास्थळी गर्दी झाल्याने पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवली होती.
सागर जगदाळे दोनशे मीटर बाजूला फेकले गेले
हिंगणे येथील कारखान्यात सागर जगदाळे हा वेल्डिंग कामगार होता. येथील सहापैकी एका टाकीवर तो वेल्डिंगचे काम करीत होता.
प्राथमिक अंदाजानुसार ही आग वेल्डिंगच्या ठिणगीने लागली असल्याची माहिती पुढे येत आहे.
आग लागल्यानंतर झालेल्या स्फोटात टाकीच्या झाकणासह सागर जगदाळे हे दोनशे मीटर बाजूला फेकले गेले आणि त्यातच ठार झाले.
रात्री उशिरा
तिसरा स्फोट
हिंगणे येथे रात्री उशिरा तिसरा स्फोट झाला. कऱ्हाड येथील नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पाचारण करण्यात आले; मात्र प्रयत्न करुनही आग आटोक्यात येत नव्हती.