स्फोटाने फोडला महाकाय दगड
By Admin | Updated: August 9, 2014 00:29 IST2014-08-09T00:03:10+5:302014-08-09T00:29:10+5:30
दरडी सत्र : पंधरा तासांनंतर यश

स्फोटाने फोडला महाकाय दगड
पाचगणी : पाचगणी-वाई घाटात दांडेघर गावाजवळ दरड कोसळून एक महाकाय दगड रस्त्यावर आल्याने गुरुवारपासून वाई-पाचगणीचे दळणवळण बंद झाले होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कालपासूनच प्रयत्न सुरू होते. अखेर आज सायंकाळी दोन टप्प्यांत स्फोट करून हा महाकाय दगड बाजूला केला.
पाचगणी-वाई घाटात दांडेघर गावापासून सुमारे एक किलोमीटरच्या अंतरावर डोंगराच्या बाजूला असणारी मोठी दरड गुरुवारी दुपारी रस्त्यात कोसळल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच-रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक गुरुवारी आणि शुक्रवारी काही काळ माघारी फिरवावी लागली होती. गुरुवारी दगडाच्या बाजूला असणारा मुरूम बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू झाली होती. शुक्रवारी सकाळी दोन जेसीबीच्या साह्याने काम पुन्हा सुरू झाले. सायंकाळी दोन टप्प्यांत स्फोट करून करून महाकाय दगड फोडण्यात आला. (वार्ताहर)