महागड्या तूरडाळीचे गरिबांना वावडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST2021-02-05T09:16:06+5:302021-02-05T09:16:06+5:30
सातारा : रेशन दुकानावर सवलतीच्या दरातील तूरडाळ मिळत नसल्याने गोरगरीब विवंचनेत आहेत. इतर दुकानांत मिळणाऱ्या महागड्या तूरडाळीचे पैशांअभावी गरिबांना ...

महागड्या तूरडाळीचे गरिबांना वावडे!
सातारा : रेशन दुकानावर सवलतीच्या दरातील तूरडाळ मिळत नसल्याने गोरगरीब विवंचनेत आहेत. इतर दुकानांत मिळणाऱ्या महागड्या तूरडाळीचे पैशांअभावी गरिबांना वावडे असल्याने शासनाने लवकरात लवकर रेशन दुकानावर तूरडाळ वाटप सुरू करण्याची मागणी आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये रेशनिंगवरून धान्य मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या शिधापत्रिका वाटपावर मर्यादा आलेली आहे. शासनाने जिल्ह्यासाठी दिलेला शिधापत्रिकेचा कोटा संपला असून सव्वा लाख शिधापत्रिका वाटपाला परवानगी मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
जिल्ह्यामध्ये १६ लाख शिधापत्रिकाधारक कुटुंबे आहेत. त्यातील ४ लाख १२ हजार १०१ शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून लाभ मिळतो. जिल्ह्याची ९ हजार मेट्रिक टन इतकी धान्याची मागणी आहे. जिल्ह्यातील ३ लाख ८६ हजार ५०० कुटुंबे रेशनिंगच्या धान्यावर अवलंबून आहेत. यातील बहुतांश वर्ग हा कष्टकरी आहे. रेशनिंगमध्ये एका महिन्याचे धान्य बुडाले तरी त्यांची अडचण होते. आता रेशनवर तूरडाळ मिळत नसल्याने गरिबांनी तूरडाळ खाणेच बंद केले आहे.
जिल्ह्यात रेशनिंग कार्डधारक : ७ लाख १९ हजार १३४
अंत्योदय योजना : २८ हजार ५००
केशरी कार्डधारक (प्राधान्य कुटुंब यादीतील) : ३ लाख ८६ हजार ५०० ग्राहक
केशरी कार्डधारक (धान्य मिळत नसलेले) : २ लाख ४६ हजार ७७५
पांढरे कार्डधारक : ५७ हजार ३५९
चौकट..
गरिबांना चणाडाळ अन् साखरही...
रेशनिंग दुकानांवर अंत्योदय योजनेतील २८ हजार लाभार्थ्यांना चणा डाळ देण्यात येत होती, आता २० रुपये प्रतिकिलो दराने साखरही देण्यात येत असून पुढील महिन्यात प्राधान्य कुटुंब यादीमधील लाभार्थ्यांनादेखील साखर सवलतीच्या दरात मिळाली. गहू, तांदूळ हे जीवनावश्यक धान्यही रेशनवर मिळते.
चौकट..
सर्वच तालुक्यांतून तक्रारी
जिल्ह्यातील ११ ही तालुक्यांतून तूरडाळ मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी रेशन दुकानदारच अडवून तूरडाळ देत नसल्याचा समज ग्राहक करून घेत आहेत. वास्तविक, शासनाकडूनच तूरडाळ उपलब्ध होत नसल्याने त्यात रेशन दुकानदारांचा काही दोष नाही.
कोट..
जिल्हा प्रशासनाने रेशनिंगचा फायदा गरजवंतांना मिळावा, यासाठी विशेष उपाययोजना केलेली आहे. सध्या शासनाकडून तूरडाळ मिळत नसून उपलब्ध झाल्यानंतर तूरडाळीचे वाटप सुरू होईल. धान्यापासून कार्डधारक वंचित राहू नये, याची काळजी घेतली जात आहे.
- स्नेहा किसवे-देवकाते, जिल्हा पुरवठा अधिकारी