खर्च 150; पावती 33 ची!

By Admin | Updated: July 15, 2015 00:21 IST2015-07-14T22:04:16+5:302015-07-15T00:21:49+5:30

‘सेतू’च्या हेतूत गोलमाल : उरलेले पैसे कोणाच्या खिशात? विद्यार्थ्यांची अडवणूक

Expense 150; Receipt 33! | खर्च 150; पावती 33 ची!

खर्च 150; पावती 33 ची!

दत्ता यादव - सातारा -नागरिकांना लागणारे विविध दाखले मिळण्यासाठी एक खिडकी योजना राबविण्याऱ्या सेतू कार्यालयाच्या ‘हेतू’मध्येच ‘गोलमाल’ असल्याची बाबसमोर आली आहे. सरसकट दाखल्यांना ३३ रुपयांची पावती दिली जात आहे. मात्र प्रत्येक्षात विद्यार्थ्यांकडून शंभर ते दीडशे रुपये जादा उकळले जात आहेत. सर्वसामान्यांची दिवसाढवळ्या लूट होत असताना तहसील कार्यालयातील वरिष्ठ मात्र मुग गिळून गप्प असल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.
शालेय, महाविद्यालयीन व इतर विविध कामांसाठी लागणारे दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयात नागरिकांची नेहमीच गर्दी होत असते. मात्र, ही गर्दी सेतू कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पत्यावर पडत आहे. कार्यालयात प्रचंड गर्दी होत असल्याने जो-तो वेळ वाचावा आणि लवकर काम होण्यासाठी आपल्याला किती पैसे द्यावे लागतायेत हे पाहात नाही. शिवाय पावती व्यतिरिक्त जादा पैसे घेतले तरी कोणी तक्रार करणार, अशी मानसिकता येथील कर्मचाऱ्यांची झाल्याने दिवसाढवळ्या विद्यार्थी व सर्वसामान्यांची लूट केली जात आहे.
सर्व दाखले एकाच ठिकाणी मिळण्यासाठी एक खिडकी योजना अंमलात आणली. मात्र तीन ठिकाणच्या खिडक्यांजवळ जाऊन पूर्वीप्रमाणेच आतल्या हाताने पैसे द्यावे लागत आहे. त्यामुळे एक खिडकी योजना केवळ नावापुरतीच उरली आहे. विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखल हवा असतो. त्यामुळे सध्या सेतू कार्यालयात बहुतांशकरून विद्यार्थ्यांच रांगेमध्ये उभे राहिलेले पाहिला मिळाले. त्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांकडे चौकशी केली असता अनेकांनी उत्पन्नाचा दाखल आणण्यासाठी येथे आलो असल्याचे सांगितले.
एका विद्यार्थ्याला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी या कार्यालयात १३५ रुपये खर्च आला. तर दुसऱ्या विद्यार्थ्याला याच दाखल्यासाठी ७५ रुपये खर्च आला. हा एवढा खर्च कसा? असे त्यांना विचारल्यानंतर त्याने गमतीशीर माहिती देत शासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
तो विद्यार्र्थी म्हणाला, सुरूवातीला दहा रुपयांचा फॉर्म घेतला. त्यानंतर हा फॉर्म भरून घेण्यासाठी मागच्या साहेबांकडे गेलो. येथे त्यांनी ३० रुपये घेतले. त्यानंतर ‘मागच्या शेड’मध्ये गेलो. तेथे पन्नास रुपये घेतले. परत सेतू कार्यालयातील खिडकी नंबर दोन येथे आलो. येथे ४५ रुपये दिले. परंतु त्यानंतर मला केवळ ३३ रुपयांची पावती हातात देण्यात आली. प्रत्येक टेबलावर पैसे वाटल्याशीवाय दाखला मिळणार नाही. म्हणून हे पैसे द्यावे लागले. कुणी कितीही काही केले तरी हा भ्रष्टाचार काही थांबणार नाही बघा, असं त्या विद्यार्थ्याने आपली हतबलता दर्शवली. विद्यार्थ्यांना आलेला अनुभव येथे प्रातिनिधीक स्वरूपात मांडला असला तरी अशा प्रकारचा अनुभव सेतू कार्यालयात आलेल्या बऱ्याच मुलांना आल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवल्याचे अनेकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगत हतबल होऊन व्यक्त केली.

येथे पावती दिली जात नाही !
सेतू कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या शेडमध्येही असाच सावळागोंधळ आहे. कुठल्या कामासाठी किती रक्कम आकारण्यात येते, याचे दर पत्रक भिंतीवर लटकविले आहे. परंतु या दर पत्रकाकडे पहायला विद्यार्थ्यांना वेळ ना स्टॅम्प वेंडरना. येथेही मनमानी पैसे उकळले जात असल्याचा विद्यार्थ्यांकडून आरोप होत आहे. येथे तर कोणतेही काम झाल्यानंतर पावती देणे हा प्रकारच नसल्याचे दिसून आले.

सात दिवस होऊन गेले तरी उत्पन्नाचा दाखल मिळाला नाही. उद्या या असे रोज सांगितले जात आहे. हा दाखल काढण्यासाठी माझ्या वडिलांकडून १३५ रुपये घेतले आहेत. मात्र पावती फक्त ३३ रुपयांची दिली आहे.
- राजन सराटे
कुसवडे ता. सातारा

सात दिवसांच्या आत दाखला नेला नाही तर मिळणार नाही, अशी सूचना आहे. दाखला मिळण्याचा कालावधी तीन दिवसांचा असताना सात दिवस झाले तरी आज या उद्या या, असे सांगितले जात आहे. मला पण ३३ रुपयांचीच पावती दिली आहे.
- संदीप गायकवाड, म्हसवे

जेवढी पावती आहे, तितक्या रकमेची पावती द्यावी, अशा सूचना सेतू कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना कालच दिल्या आहेत. परंतु तरीही विद्यार्थ्यांकडून जास्त पैसे घेतले जात असतील तर संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल.
- राजेश चव्हाण, तहसीलदार सातारा

येथे पावती दिली जात नाही !

Web Title: Expense 150; Receipt 33!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.