छान नोकरी, मस्त छोकरी इतकीच अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST2021-09-02T05:25:55+5:302021-09-02T05:25:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गोड बोलून लग्न करून पुढं आयुष्यभर ऐकमेकांना दूषण देत, संसार करण्याचा काळ आता मागे ...

छान नोकरी, मस्त छोकरी इतकीच अपेक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : गोड बोलून लग्न करून पुढं आयुष्यभर ऐकमेकांना दूषण देत, संसार करण्याचा काळ आता मागे पडला आहे. छान नोकरी ही मुलींची आणि मस्त छोकरी ही मुलांची लग्न करण्यासाठीची टॅगलाइन झाली आहे. पटलं तर हो, नाहीतर गो, असं ठणकावून सांगणाऱ्या या पिढीने वादंग टाळण्यासाठी स्पष्ट मते मांडून सुखी संसार करण्याचं ठरविलं आहे.
प्रेमविवाहापेक्षाही ठरवून लग्न करण्याला तरुणाईची पसंती आहे. यासाठी रीतसर पत्रिका काढून कांदा पोहेचा कार्यक्रमही अनेकांनी अनुभवला आहे, पण आता मुलींनीच या गोष्टीला हरकत घेतली आहे. ऑनलाइन स्थळं बघून त्यातील जे पसंत आहेत, त्यांनाच घरी बोलावलं जाते. मुलींच्या मते, ‘स्थळ बघायला येणार म्हटलं की, आजूबाजूसह पै पाहुण्यांना याची माहिती दिली जाते. पहिले तीन-चार स्थळ बघेपर्यंत कोणी काही बोलत नाही, पण पाचहून अधिक स्थळ बघून गेल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ताण आणि लग्न ठरत नसल्याने नजरेत कीव अशा दोन्ही भावना डोकावतात. याची चर्चा होते ते आणि वेगळंच, म्हणूनच आपल्याच पसंतीचे स्थळ बोलविण्याला आम्ही प्राधान्य देतो.’
परदेशी जाणं रद्द, मग लग्नच नको!
लग्नानंतर परदेशी संसार थाटण्याची इच्छा मुलींमध्ये अधिक असते. त्यामुळे फॉरेनच्या मुलांना चांगलीच मागणी आहे. शहरातील एक किस्सा मात्र नवल करायला लावणारा आहे. कोविडमुळे परदेशी असणारा मुलगा साताऱ्यात आला. त्याच्या कंपनीनेही घरूनच काम करा, म्हणून सांगितलं. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि आपल्या देशात काम करायला अमाप संधी असल्याचं हेरून या तरुणाने भारतातच राहण्याचं ठरवलं. त्याचा हा निर्णय त्याच्या होणाऱ्या पत्नीला मान्य नव्हता. परिणामी, तिने हे लग्नच मोडले.
या अपेक्षांची पडली भर
खात्रीची नोकरी पाहिजे
व्यावसायिक शक्यतो नकोच
न्युक्लिअर कुटुंबाला पसंती
निर्व्यसनी असावा
या अपेक्षा झाल्या कमी
मोठ्या शहरातलंच स्थळ पाहिजे
दिसायला सुंदरच पाहिजे
मोठ्या कुटुंबातही संसाराची तयारी
नोकरी करणारी पत्नी असावी
कोट
महानगरांपेक्षाही निमशहरांमध्ये लग्न होऊन जाण्याची मानसिकता मुलींची दिसते. पूर्वीसारखं गोड गोड बोलणं आता कालबाह्य झालंय. आपल्या आवडी-निवडी आणि भविष्यातील अडचणींच्या चर्चा तरुणाई खूपच स्पष्टपणे करते.
- जयश्री शेलार, सोयरीक मंडळ, सातारा
मुली नोकरीसह देखणेपणाला तर मुलींचे शिक्षण मुलांसाठी अधिक महत्त्वाचं असते. पूर्वी मुलींना बघायला जाण्याचा ट्रेन्ड बदलला आहे. ऑनलाइन सर्फ करून योग्य वाटलेल्या स्थळाला भेटायला बोलावले जाते, तर मुलं मात्र थेट घरी जाऊन मुली बघण्याला प्राधान्य देतात.
- नीलेश शिंदे, मनमिलन मंडळ, सातारा.
मुलीचं सौंदर्य अन् मुलाचं कर्तृत्व याचीच चलती
पुरुषांचं सौंदर्य त्यांच्या कर्तृत्वात आणि महिलेचं कर्तृत्व तिच्या सौंदर्यात असं समीकरण लग्न जुळविताना पाहिलं जाते. लग्नासाठी मुलीच्या डिग्रीपेक्षा तिच्या सौंदर्याला महत्त्व दिले जाते, तर मुलाची नोकरी, त्याची सेटलमेंट याकडे मुलींचे लक्ष असते. सध्या अवघे २० टक्के मुलं आर्थिक स्वावलंबी आणि सक्षम आहेत. बाकीच्यांच्या बाबतीत अद्यापही स्थिरता न आल्याने, हे विवाहेच्छुक मुलींनी पसंत करावं, म्हणून थटून बसले असल्याचे विवाह मंडळ चालक सांगतात.