मोबाईलचा अतिवापर मुलांसाठी ठरतोय घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:25+5:302021-05-23T04:39:25+5:30
कुडाळ : मोबाईल हे छोटेसे यंत्र आज सर्वांनाच निकडीची गरज बनला आहे. कोरोना महामारीच्या काळात मुलांसह वयोवृद्धांपर्यंत शिक्षण आणि ...

मोबाईलचा अतिवापर मुलांसाठी ठरतोय घातक
कुडाळ : मोबाईल हे छोटेसे यंत्र आज सर्वांनाच निकडीची गरज बनला आहे. कोरोना महामारीच्या काळात मुलांसह वयोवृद्धांपर्यंत शिक्षण आणि करमणुकीचे साधन बनला. मुलांना शालेय अभ्यास करताना याचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. त्यामुळे त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यात शिक्षक वर्गालाही मदत झाली. मात्र, याचा अतिवापर हा आजच्या पिढीला घातक ठरू लागला आहे.
आजची पिढी ही आतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असणारी आहे. परंतु ज्या वयात त्यांना मैदानाची गोडी लावायला हवी. अशा वयातच त्यांच्या डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची किमया याला कारणीभूत आहे असे म्हणावे लागेल. अगदी लहान बाळापासूनच याची सुरुवात होत आहे. कळत न कळत या मोबाईलच्या हव्यासाची त्यांना सवय जडत आहे.
कोरोना काळात तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली. लहान-थोरांचे शिक्षण आणि काम याद्वारेच घरातून होत आहे. शिक्षकांनी मेहनत घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना याच माध्यमातून अध्ययनप्रवण ठेवण्याचे कार्य केले. पण विद्यार्थ्यांनी नेमकेपणाने याचा उपयोग कितपत केला हेही महत्त्वाचे आहे. पालकांनी याकडे जाणीवपूर्वक पाहिले का? हा प्रश्न आहे. कारण मोबाईलवर शिकण्याबरोबरच अन्य विषयांकडे मुले भरकटली गेली असल्याचाही तक्रारी समोर आल्या आहेत.
ज्ञानाची कवाडे उघडून आवश्यक ते ज्ञान उपलब्ध होण्याकरिता या छोट्याशा मोबाईलची मोठी मदत होत आहे. मात्र, आजची लहान पिढी या मोबाईलमध्ये रममाण होत एकलकोंडी होऊ लागली आहे. पालकांनी योग्य दक्षता घेत मुलांच्या मोबाईल वेडाला वेळीच आळा घालायला हवा.
परस्पर संवाद महत्त्वाचा
परस्पर संवादातून मुलांची मानसिकता आणि खेळाच्या माध्यमातून शारीरिक सुदृढता राखण्यात मदत होईल. याकरिता आवश्यक वापराव्यतिरिक्त मुलांना मोबाईलपासून परावृत्त करण्याची भूमिका पालकांनी बजावायलाच हवी.