राष्ट्रवादीची गटबाजी रोखण्याची परीक्षा
By Admin | Updated: October 26, 2016 00:21 IST2016-10-25T23:04:38+5:302016-10-26T00:21:20+5:30
निवडणुकीच्या तोंडावर धक्कातंत्र : शेखर गोरे यांच्या प्रवेशामुळे पक्षाला बळकटी

राष्ट्रवादीची गटबाजी रोखण्याची परीक्षा
सचिन मंगरूळे -- म्हसवड -माण तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष बलाढ्य होता व आहे; पण राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाची ताकद गटागटांत विभागली गेल्याने पक्षाला नेतृत्व उरले नसल्याने पक्षाची अवस्था सैन्य आहे, पण सेनापती नाही अशी झाली होती. पण आता माण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शेखर गोरेंच्या रूपाने सेनापती मिळाल्याने माणमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा गतवैभव मिळेल, अशी आशा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. दरम्यान, शेखर गोरे हे बुधवार, दि. २६ रोजी मुंबई येथे कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
माण तालुका वगळता संपूर्ण सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. परंतु माणमध्ये २००९ च्या विधानसभेनंतर पक्षाची अवस्था केविलवाणी होत गेली. त्याचे कारण अंतर्गत गटबाजी ठरली. तालुक्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार दिवंगत सदाशिवराव पोळ यांना शह देण्यासाठी पक्षातील झारीतील शुक्राचार्यांनी प्रत्येक निवडणुकीत डोके वर काढल्याने पक्ष बॅकफूटवर जात गेला. तात्यांचा शांत व संयमी स्वभावाचा फायदा गटबाजीने घेतला गेला. आपण कसेही वागलो तरी आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, ही भावना वाढीस लागली अन् तालुक्यातील राष्ट्रवादीची अवस्था बुडत्या जहाजासारखी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरज होती आक्रमक सेनापतीची जो अंतर्गत गटबाजी रोखू शकतो. असा चेहरा गोरेंच्या रूपाने पक्षाला गवसला असून, त्यांच्या पुढे अनेक आवाहने असून, महिन्यात होत असलेल्या माण-खटाव मतदार संघातील सर्वाधिक मतदार संख्या असणारी म्हसवड नगरपरिषद, तालुक्याचे मुख्यालय असणारी दहिवडी नगरपंचायत, वडूज नगरपंचायत निवडणुकीत सत्ता हस्तगत करण्यासाठी यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.