माजी विद्यार्थी रंगले आठवणीत
By Admin | Updated: January 2, 2015 23:59 IST2015-01-02T21:05:15+5:302015-01-02T23:59:48+5:30
उंडाळेत स्नेहमेळावा : उंडाळकर विद्यालयात जमले जुने सवंगडी

माजी विद्यार्थी रंगले आठवणीत
उंडाळे : येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्रेहमेळावा उत्साहात पार पडला़ शैक्षणिक जीवनामधून व्यवहारिक, प्रापंचिक जीवनात स्थिरावलेल्या विद्यार्थ्यांच्या शालेय आठवणी पुन्हा जागा होऊन माजी विद्यार्थीही शालेय जीवनातील आठवणीत हरवून गेले़
येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील २००८-२००९ च्या माजी विद्यार्थ्यांनी नुकताच स्रेहमेळावा आयोजित केला होता़ त्यानिमित्ताने शिक्षण संपवून बाह्य जगतात विविध ठिकाणी कार्यरत असणारे आपले जुने सवंगडी भेटतील, जुन्या आठवणी जागृत होतील, शिक्षकांची भेट होईल, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणे. ज्या शाळेने स्वत:च्या पायावर उभे केले तिच्या ऋणातून मुक्त होणे, या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ त्यामधील अनेकजण शिक्षण संपवून विविध व्यावसायिक, नोकरीमध्ये कार्यरत आहेत़ त्या प्रत्येकाने आपल्याबरोबरील जुन्या मित्रांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला़ तर अनेकांना आपले जुने मित्र फार वर्षांनी भेटले़ त्यावेळी मित्रांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसांडून वाहत होता़ यावेळी त्यांच्या मनात निर्माण झालेल्या भावनांचा कल्लोळ त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता़ अनेकांना त्याचे जुने शिक्षक भेटले़ त्यांच्या हातचा मार खाऊन शिक्षणात यशस्वी झालेल्या या विद्यार्थ्यांनी मोठ्या मनोभावे आपल्या शिक्षकांचे आशीर्वाद घेतले़ शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी उपस्थित शिक्षकांना शाल, श्रीफळ व शिल्ड भेट देऊन त्यांचा सन्मान केला़
प्राचार्य एम़ बी़ पाटील अध्यक्षस्थानी होते़ यावेळी एस़ एस़ पवार, बी़ पी़ मिरजकर, आनंदराव जानुगडे, शंकर आंबवडे यांची भाषणे झाली़ मेळावा यशस्वी करण्यासाठी अक्षय पाटील, सुमित शिंदे, विकास पाटील, प्रज्ञा पाटील, प्रीती कांबळे आदींनी परिश्रम घेतले़
प्रीती कांबळे यांनी प्रास्ताविक केले़ प्रज्ञा पाटील यांनी सूत्रसंचालन केले़ अक्षय पाटील यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)