आजी विरुद्ध माजी पालकमंत्री
By Admin | Updated: January 14, 2015 23:41 IST2015-01-14T21:25:43+5:302015-01-14T23:41:57+5:30
सातारा : बालेकिल्यासाठी राष्ट्रवादी-शिवसेना जुंपली

आजी विरुद्ध माजी पालकमंत्री
सातारा : एकेकाळी राष्ट्रवादीमध्ये आक्रमक नेते म्हणून ओळख निर्माण करून विरोधकांना सळोकी पळो करून सोडणारे विजय शिवतारे यांनी धनुष्यबान हातात घेतला. तो राष्ट्रवादीलाच संपविण्यासाठी की काय अशी परिस्थिती सध्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जोर धरू लागलीय. खुद्द राष्ट्रवादीच्या बालेकिल्यातच येऊन शिवतारे यांनी राष्ट्रवादीला प्रतीआव्हान दिले. हे माजी पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांना चांगलेच खटकले. त्यांनीही मग शिवतारे यांना सबुरीचा सल्ला देत ‘पक्ष वाढवा पण आम्हाला कमी समजू नका,’ असा गर्भीत इशाराही दिला.कोरेगाव येथील आयोजित कार्यक्रमात रामराजे बोलत होते. या नव्या आरोप प्रत्यारोपामुळे आजी विरूद्ध माजी पालकमंत्री असा नवा वाद आता जिल्ह्याला पाहायला मिळणार आहे.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळेच या ठिकाणी दुसऱ्या पक्षाला आपले बस्तान बसविणे फार जिकरीचे होते. हाच विचार करून कदाचित युती शासनाने राष्ट्रवादीची पाळेमुळे जाणून असणारे व शरद पवारांचे कट्टर विरोधक पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांना सेनेने सातारचे पालकमंत्रीपद बहाल केले.
गांधी मैदानावर झालेल्या सत्कार सोहळ्यात शिवतारे यांनी राष्ट्रवादीलाच लक्ष केले. सातारा हा बालेकिल्ला कुणा एकाचा नाही. बारामतीही एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. आता तो राहिला नाही. त्याचेही बुरूज ढासळले. अशी टीका करत शिवतारे यांनी राष्ट्रवादीला अक्षरश: झोडून काढले.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात येऊन शिवतारे यांनी केलेली वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्यांना झोंबली. त्यामुळे माजी पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोरेगाव येथील एका कार्यक्रमात शिवतारे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. रामराजेंनीही आक्रमकपणे शिवतारे यांच्यावर टीका केली. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून आम्ही घाम गाळून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकासकामे पोहोचवली आहेत. त्यामुळे बालेकिल्ला अबाधीत ठेवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहाणार आहे. तुम्ही पक्षा संघटना आवश्य वाढवा , मात्र आम्हालाही कमी समजू नका, असा इशाराही त्यांनी यानिमित्ताने दिला (प्रतिनिधी)
आरोप प्रत्यारोपांची रणधुमाळी
घाम गाळून आम्ही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकासकामे पोहोचवली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कोणीही कमी समजू नये.
सातारा हा कुणा एकाचा बालेकिल्ला नाही. जिल्ह्यातील शिवसैनिकांना बरोबर घेऊन राष्ट्रवादीचा बुरूज शिवसेना ढासळून दाखवेल.