माजी नगरसेवकांना उपरतीचा ‘मान’!

By Admin | Updated: November 5, 2014 23:44 IST2014-11-05T21:30:25+5:302014-11-05T23:44:17+5:30

आपत्तीत केली मदत : पालिका निवडणुकीत भूमिका महत्त्वाची ठरणार

Ex-corporators 'honor'! | माजी नगरसेवकांना उपरतीचा ‘मान’!

माजी नगरसेवकांना उपरतीचा ‘मान’!

सातारा : ऐतिहासिक मनोमिलनाचे साक्षीदार आणि आता मान मिळण्यासाठी झुंजणाऱ्या साताऱ्यातील काही माजी पदाधिकाऱ्यांनी ‘मान’ ग्रुपची स्थापना केली आहे. विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेंचे मताधिक्य कमी करण्यासाठी या ग्रुपने महाबळेश्वरात गुप्त बैठक घेतल्याची चर्चा मधल्या काळात जोरदार रंगली होती. आता या ग्रुपला दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याची उपरती झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात सुमारे दहा वर्षांपूर्वी मनोमिलन झाले. सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडी यांच्यातील वितुष्ट कमी झाले. मात्र, पुढची निवडणूक मनोमिलनातून झाल्याने अनेकांना घरचा रस्ता धरावा लागला होता. काहीना तर प्रयत्न करूनही पालिका निवडणुकीत तिकीट मिळाले नाही. या परिस्थितीत मोठ्या कोंडीत सापडलेली ही मंडळी काही दिवसांपूर्वी एकत्र आली. या सर्वांची महाबळेश्वरात गुप्त बैठक झाली. या बैठकीतच शिवेंद्रसिंहराजे यांचे मताधिक्य कमी करण्यासाठी आडाखे रचले गेल्याची जोरदार चर्चा होती. निवडणुकीनंतर शहरातून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मताधिक्य कमी मिळाले. दीपक पवार यांच्यापेक्षा बहुतांश मतदान केंद्रांवर ५९ टक्के कमी मते शिवेंद्रसिंहराजेंना मिळाली. दरम्यान, अनंत चतुर्दशीला साताऱ्यात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीच्या आवाजाने भिंत पडून झालेल्या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या अश्विनी नीळकंठ भिसे या महिलेला साताऱ्यातील या माजी नगसेवकांचा ग्रुप ‘मान’ ने आर्थिक मदतीचा हात दिला आहे. अनंत चतुर्दशी दिवशी दि. ८ सप्टेंबर रोजी साताऱ्यात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीच्या दणदणाटामुळे राजपथावर जनता बँकेची शहर शाखा आणि एलआयसी इमारतीशेजारी असलेल्या १०५ वर्षांच्या एका जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतीची भिंत कोसळून वडापाव विक्रेते चंद्रकांत बोले, एलआयसीतील निवृत्त शिपाई उमाकांत कदम आणि एलआयसीचे वॉचमन गजानन कदम हे तीन जण ठार तर मंगळवार पेठेत राहणाऱ्या अश्विनी नीळकंठ भिसे (वय ४०) या गंभीर जखमी झाल्या होत्या. या दुर्घटनेत भिसे यांचे दोन्ही पाय फॅक्चर झाले असून, त्यांची शस्त्रक्रिया करण्यात येऊन दोन्ही पायांत लोखंडी रॉड टाकण्यात आले आहेत. भिसे यांना या दुर्घनेत डोक्यालाही मोठी दुखापत झाली होती. भिसे यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय या गु्रपने घेतला. यावेळी मान गु्रपचे सदस्य अशोक मोने, डॉ. अच्युत गोडबोले, सुधीर धुमाळ, महेश राजेमहाडिक, सुनील जाधव, श्रीकांत भणगे, जनार्दन किर्दत, अरुण यादव, रणजित साळुंखे, विजय तारू, महेश महामुनी, जनार्दन ऊर्फ पिंटू जगदाळे, संजय साठे, रमेश जाधव व नंदकुमार चक्के उपस्थित होते. (प्रतिनिधी) साडेसात हजारांची केली मदत भिसे यांच्या कुटुंबीयांना साडेसात हजारांची मदत करण्यात आली आहे. यापुढेही गरीब व गरजू लोकांना मदतीचा हात देण्यासाठी ‘मान’ गु्रप प्रयत्न करणार असल्याचे या ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले.

Web Title: Ex-corporators 'honor'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.