कऱ्हाड (जि. सातारा) : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करत महिलांना आर्थिक लाभ दिला. त्यानंतर लाडक्या बहिणींनी आम्हाला निवडणुकीत मते दिल्याचे सांगितले. मात्र, लाडकी बहीण योजनेचा दिखावा करून सरकारने ईव्हीएम घोटाळा लपवला असल्याची टीका माजी मंत्री बच्चू कडू यांनी केली.येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बच्चू कडू म्हणाले, शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांग बांधवांचे मानधन यासह विविध मागण्यांसाठी आम्ही २ जूनपासून बारामतीतून आंदोलनाला सुरुवात करीत आहोत. सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प कसा सामान्य माणसापासून दूर गेला, याची मांडणी आम्ही बारामतीत अर्थमंत्र्यांच्या गावी करणार आहे.आमदार, खासदारांना वेळेत पगार मिळतो; पण..अर्थमंत्री अजित पवार जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांचा पगार ५५ हजार रुपये होता. आता त्यांचा पगार साडेतीन लाखांवर गेला आहे. तो पगारही वेळेत मिळतो. मी माजी आमदार आहे, माझीही पेन्शन मला वेळेत मिळते. मात्र, शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. सध्या जो भाव आहे त्यातच पडझड होत असते. त्यामुळे हा विरोधाभास गरीब-श्रीमंतीमधील दुरी दर्शवितो. आमदार, खासदारांना वेळेत पगार मिळतो. मात्र, आमच्या शेतकऱ्यांना, दिव्यांग बांधवांना हक्काच्या पैशासाठी आंदोलन करावे लागते, ही दुर्दैवी गोष्ट आहे, असेही माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले.
‘लाडकी बहीण’चा दिखावा करून ईव्हीएम घोटाळा लपवला, बच्चू कडू यांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:56 IST