सगळ्यांना वाटतंय, ‘गुलाल आपलाच’
By Admin | Updated: April 13, 2016 23:36 IST2016-04-13T20:38:15+5:302016-04-13T23:36:44+5:30
चौकाचौकांमध्ये रंगल्या पैजा : पहिल्याच नगरपंचायतीत यश आपलेच हीच कार्यकर्ता अन् नेत्यांची भावना

सगळ्यांना वाटतंय, ‘गुलाल आपलाच’
राहीद सय्यद -- लोणंद --नगरपंचायत निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असून, प्रत्येक प्रभागात दावे-प्रतिदाव्यांनी चुरस निर्माण झाली आहे. विजयाचे संकेत आपल्याच उमेदवाराकडे होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या चौदा उमेदवारांसह पुरस्कृत दोन उमेदवारांसाठी प्रचाराचे रान उठविले आहे. राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या रणधुमाळीने लोणंद शहरात घडाळ्याचा गजर रात्रन्दिवस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या तालुक्यातील प्रमुखांनीही या निवडणुकीत झोकून दिल्याने पक्षाला प्रचारयंत्रणा राबविणे सोयीचे ठरत आहे.
विरोधकांच्या प्रचारयंत्रणेवर नजर ठेवत आक्रमक भूमिका घेतल्याने कार्यकर्ते हातात हात घालून पक्षाचे बळ वाढवित आहेत. अॅड. बाळासाहेब बागवान यांच्या सूत्रबद्ध प्रचार फेरीने उमेदवारांचे काम अधिक सोपे होत आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकीकडे लढाईचे रणांगण तापविले आहे. तर भाजपानेही मोजक्या ठिकाणी ताकद लावल्याचे दिसते; मात्र एरव्ही कणखर बाणा मिरवणाऱ्या शिवसेनेची मात्र तलवार म्यान झाली असल्याची चर्चा चौकाचौकांमध्ये ऐकायला मिळतेय. नेत्यांनीच पाठ फिरविल्याने उमेदवार वाऱ्यावर, अशी गत सेनेची झाली आहे. नवख्या भाजपाने मात्र लक्षवेधी लढत देण्याच्या इराद्याने रणनीती आखल्याचे पाहायला मिळतेय.
वास्तविक, लोणंद नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता पहिल्याच प्रयत्नात यावी, यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी तळ ठोकल्याने विरोधकांची भंबेरी उडाली आहे. त्यांना तोंड देण्यासाठी काँगे्रसने जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील आणि अन्य नेत्यांना उतरवून आपणही मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. निवडणुकीतील प्रचार सभांपेक्षा पडद्यामागच्या हालचाली अधिक वेगाने आणि गुप्तरीत्या सर्वच पक्षांकडून सुरू आहेत. रात्रीच्या अंधारातील गुप्तगू दिवसा, उजेडीच्या प्रचाराची रणनीती ठरवून जाते आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पारंपरिक लढतीत पहिल्यांदाच भाजप उतरल्याने कोणत्या प्रभागात भाजप किंवा अपक्ष उमेदवार किती मते घेणार, याची गणिते आत्ताच मांडली जाऊ लागली आहेत. त्यानुसार कोण विजयाकडे झुकणार, याचे कयास लावले जात आहेत. आरोप-प्रत्यारोपांनी चिखलफेक केल्याने नको एवढ्या गढूळ वातावरणात संध्याकाळच्या शीतल झुळकेत आपल्याच माणसांचा रुसवा काढण्यावर भर दिला जात आहे.
प्रभागवार समस्या आणि घराघरांमध्ये शिरलेले राजकारण, भाऊबंदकीचा वाद, आणि जातीय समीकरणांनी आडाखे बांधले जात आहेत. शहरातील चौकाचौकांमध्ये एकोप्याने राजकीय चर्चा रंगविल्या जाऊन उमेदवारांचे भविष्य मांडले जात आहे. मात्र, खरा लेखाजोखा मतदारराजा आपल्या मतामधूनच व्यक्त करेल, हे मात्र निश्चित!
अपक्षांचा दणका
प्रभाग क्र. १, ६, १२, १५ मध्ये प्रबळ अपक्षांनी दावेदारी केल्याने येथे
कोणत्या पक्षाला दणका बसणार, यावर सत्तेची समीकरणे मांडली जात आहेत. त्या ठिकाणाच्या अपक्षांनी आपल्याच पक्षांना खुले आव्हान दिल्याने हा धक्का तारक की मारक काही दिवसांत स्पष्ट होईलच.